Join us  

मोठा गौप्यस्फोट! क्रूझवरील आरोपींना नेणारा भाजपचा पदाधिकारी?; मोदी, शहांसोबतचे फोटो राष्ट्रवादीनं दाखवले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2021 2:55 PM

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचे सनसनाटी आरोप; भाजप-एनसीबीचा संबंध काय?; मलिक यांचा सवाल

मुंबई: क्रूझ शिप ड्रग्ज पार्टीवरील कारवाईबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं संशय व्यक्त करत एनसीबीच्या संपूर्ण कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. एनसीबीच्या कारवाईवेळी भाजपचा पदाधिकारी काय करत होता? भाजप आणि एनसीबीचा नेमका संबंध काय? असे सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उपस्थित केले. आर्यन खानसोबत अटक करण्यात आलेल्या अरबाज मर्चंटला एनसीबी कार्यालयात घेऊन जाणारा व्यक्ती भाजपचा पदाधिकारी असल्याचा दावा मलिक यांनी केला. त्यांनी या व्यक्तीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबतचे फोटोदेखील दाखवले.

क्रूझवर छापा टाकून एनसीबीनं आर्यन खानला अटक केली. यावेळी एका व्यक्तीनं त्याच्यासोबत फोटो काढला. त्या व्यक्तीचा आणि आर्यन खानचा एक सेल्फीदेखील व्हायरल झाला. मात्र तो आमचा अधिकारी नव्हताच, असं एनसीबीनं नंतर सांगितलं. मग हा व्यक्ती कोण होता? तो आर्यन खानसोबत काय करत होता? एनसीबीनं याची उत्तरं द्यायला हवीत, असं मलिक म्हणाले.

भाजपचा पदाधिकारी एनसीबीच्या कारवाईवेळी काय करत होता?आर्यन खानसोबतच अरबाज मर्चंटलादेखील क्रूझवरून अटक करण्यात आली. त्याला एक जण पकडून एनसीबीच्या कार्यालयात नेत होता. ही व्यक्तीदेखील एनसीबीशी संबंधित नाही. तो भाजपचा उपाध्यक्ष मनीष भानुशाली आहे. त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप आमदार आशिष शेलार यांच्यासोबत फोटो आहेत, असा दावा मलिक यांनी केला. त्यांनी भानुशालीचे फोटोदेखील पत्रकार परिषदेत दाखवले.

भानुशाली गेले १५ दिवस काय करत होता?मनीष भानुशाली २१ सप्टेंबरला दिल्लीला गेला होता. तिथे त्यानं भाजप नेत्यांशी गाठीभेटी घेतल्या, अशी माहिती मलिक यांनी दिली. '२२ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या कालावधीत भानुशाली गुजरातमध्ये होता. तिथे त्यानं मंत्रालयात काही बैठका घेतल्या. २२ सप्टेंबर तारीख अतिशय महत्त्वाची आहे. कारण याच दिवशी अदानी समूहाशी ताब्यात असलेल्या गुजरातमधल्या मुंद्रा बंदरावर ३ हजार किलो अंमली पदार्थ सापडले,' असा घटनाक्रम मलिक यांनी सांगितला. २८ सप्टेंबरला भानुशाली मुंबईत आला. मग १ ऑक्टोबरला पुन्हा गुजरातला गेला. तिथून तो मुंबईत परतला आणि क्रूझवर एनसीबीनं केलेल्या कारवाईवेळी तो उपस्थित होता, असं मलिक म्हणाले. 

टॅग्स :आर्यन खाननवाब मलिकनरेंद्र मोदीनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो