Join us  

Aryan Khan Drug Case: आर्यनच्या जामिनावर मंगळवारी सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 10:25 AM

Aryan Khan Drug Case: न्या. सांब्रे यांनी आर्यनच्या जामीन अर्जावर २६ ऑक्टोबर रोजी सुनावणी ठेवली. त्या दिवशी आर्यन खानसह मुनमुन धमेचा हिच्याही जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात येईल. 

मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्या जामीन अर्जावरील सुनावणी उच्च न्यायालयाने २६ ऑक्टोबर रोजी ठेवली. दरम्यान, विशेष एनडीपीएस न्यायालयाने आर्यन खान व अन्य आरोपींच्या  न्यायालयीन कोठडीत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ केली.आर्यन खान याचे वकील सतीश मानेशिंदे यांनी न्या. एन. डब्ल्यू. सांब्रे यांच्या एकल पीठापुढे गुरुवारी आर्यनचा जामीन अर्ज सादर केला. शुक्रवारी या अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंती मानेशिंदे यांनी केली. मात्र, एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी पुढील आठवड्यापर्यंत मुदत मागितली. त्यामुळे न्या. सांब्रे यांनी आर्यनच्या जामीन अर्जावर २६ ऑक्टोबर रोजी सुनावणी ठेवली. त्या दिवशी आर्यन खानसह मुनमुन धमेचा हिच्याही जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात येईल. बुधवारीच विशेष एनडीपीएस न्यायालयाने आर्यन खान आणि सहआरोपी अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा यांचा जामीन अर्ज फेटाळला. आर्यन याचा जामीन अर्ज फेटाळताना विशेष न्यायालयाने निरीक्षण नोंदविले आहे की, आर्यन खानच्या व्हॉट्स ॲप चॅटवरून तो अमली पदार्थांसंदर्भात नियमित व्यवहार करत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे त्याची जामिनावर सुटका केली तरी पुन्हा असे कृत्य करणार नाही, याची खात्री देऊ शकत नाही. त्यामुळे तपास सुरू असताना त्याची जामिनावर सुटका करणे योग्य नाही. आर्यन, अरबाज, व मुनमुन यांना एनसीबीने ३ ऑक्टोबर रोजी अटक केली. त्यानंतर या तिघांना ४ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आणि ती पूर्ण झाल्यावर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आर्यन खान व अन्य दोन आरोपींच्या वकिलांनी लगेच जामिनासाठी अर्ज केला. मात्र, महानगर दंडाधिकाऱ्यानी आपल्याला या जामीन अर्जावर सुनावणी घेण्याचा अधिकार नाही, असे स्पष्ट करत तिघांचाही जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे आर्यन खानच्या वकिलांनी विशेष एनडीपीएस न्यायालयात अर्ज केला. एनडीपीएस न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका करण्यास नकार दिला.  

टॅग्स :आर्यन खाननार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोमुंबई हायकोर्ट