Join us
Daily Top 2Weekly Top 5

अरुणाच्या स्वातंत्र्यासाठीचा अविस्मरणीय लढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 08:32 IST

Aruna Shanbaug : रुग्णालय प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार वॉर्ड नंबर ४, मधील साइड रुम हा अरुणा यांचा कायमचा पत्ता.

- संतोष आंधळे, विशेष प्रतिनिधी

शातीलच नव्हे तर जगभरातील वैद्यकीय वर्तुळाला केईएममधील परिचारिका अरुणा शानबाग यांची मृत्यूशी ४२ वर्ष झुंज परिचित आहे. १९७३ मध्ये  रुग्णालयात वॉर्डबॉयने केलेल्या हल्ल्यानंतर  शानबाग कोमामध्ये गेल्या, त्यानंतर त्यांना जगण्याच्या संघर्षात साथ दिली ती या रुग्णालयातील परिचारिकांनीच. 

रुग्णालय प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार वॉर्ड नंबर ४, मधील साइड रुम हा अरुणा यांचा कायमचा पत्ता. अंथरुणाला खिळून असलेल्या अरुणा यांना त्या अवस्थेत रक्ताच्या नात्यांची साथ फारशी मिळाली नाही. मात्र, त्यांच्या या  ४२ वर्षांच्या जगण्याच्या संघर्षात कित्येक परिचारिकांनी त्यांची केवळ शुश्रुषाच केली नाही तर आपुलकीने सांभाळही केला. रुग्णालयात काम करणाऱ्या प्रत्येकाने अरुणा यांच्या खाण्यापिण्याच्या आवडी निवडी लक्षात ठेवल्या. वेळच्या वेळी त्यांना औषधे दिली, स्पंजिंग, चेंजिंगमध्ये मदत केली. अरुणाच्या या ४२ वर्षांच्या रुग्णालय मुक्कामात रुग्णालयातील प्रत्येक परिचारिकेला त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. 

दरवर्षी साजरा व्हायचा वाढदिवसशानबाग यांच्या संघर्षाच्या ३९ वर्षे साक्षीदार राहिलेल्या अनुराधा पराडे यांनीही इतर परिचारिकांप्रमाणेच त्यांची शुश्रूषा केली. तसेच त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. त्या सांगतात, ‘परिचारिका कल्याणकारी संस्थेची २०११ साली मी सचिव झाले तेव्हा आम्ही सगळ्यांनी अरुणाचा दि. १ जून रोजी वाढदिवस साजरा केला. तो पुढे आम्ही दरवर्षी साजरा करायचो.’ त्या पुढे सांगतात, ‘अरुणाला २०१३ साली आयसीयूमध्ये दाखल करावे लागले. मात्र, डॉ. नितीन कर्णिक आणि त्यांच्या टीमच्या अथक प्रयत्नामुळे ती परत वॉर्ड ४ मध्ये आली.  

१५ मे २०१५ ला श्वसनविकाराचा त्रास चालू झाला आणि अखेर १८ मे रोजी निधन झाले. रुग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी मला आणि मेट्रन यांना बोलावून अरुणाची अंत्ययात्रा सन्मानाने काढण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल याची हमी दिली.मुंबईतील इतर रुग्णालयांतील अनेक परिचारिकाही अरुणा यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाल्या होत्या. मी आणि सरांनी तिच्या पार्थिवाला अग्नी दिला. अरुणाला अखेरचा निरोप देताना सर्वांच्याच डोळ्यात अश्रू होते...’

टॅग्स :मुंबई