अरुणा शानबाग प्रकरणाची फाईल बंद

By Admin | Updated: May 30, 2015 01:59 IST2015-05-30T01:59:30+5:302015-05-30T01:59:30+5:30

के. ई. एम. रुग्णालयातील परिचारिका दिवंगत अरुणा शानबाग हिची केस पूर्णपणे बंद झाली आहे. ती तब्बल ४२ वर्षे कोमात होती.

Aruna Shanbagh case file closed | अरुणा शानबाग प्रकरणाची फाईल बंद

अरुणा शानबाग प्रकरणाची फाईल बंद

डिप्पी वांकाणी - मुंबई
के. ई. एम. रुग्णालयातील परिचारिका दिवंगत अरुणा शानबाग हिची केस पूर्णपणे बंद झाली आहे. ती तब्बल ४२ वर्षे कोमात होती. तिच्या या स्थितीला जबाबदार ठरलेल्या वॉर्डबॉयला पुन्हा अटक करून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच नाही, असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. एकाच गुन्ह्याखाली कोणत्याही आरोपीवर दोनदा खटला चालवता येत नाही. या गुन्ह्याची शिक्षा त्याने एकदा भोगली आहे.
अरुणावर अत्याचार करणारा आरोपी सोहनलाल वाल्मिकी अद्याप जिवंत आहे. त्याच्यावर पोलीस खुनाचा गुन्हा दाखल करणार काय, असे विचारले असता प्रभारी पोलीस आयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी म्हणाले की, त्याला पकडण्यासाठी पोलीस पथक पाठवण्याचा विचार नाही, कारण त्यामुळे दुहेरी गोंधळ होईल. त्याने या गुन्ह्यासाठी एकदा शिक्षा भोगली आहे, आता तो मुक्त नागरिक आहे.
अरुणा शानबागवर ज्यावेळी अत्याचार झाले, त्यात त्या तात्काळ मरण पावल्या असत्या तर सोहनलाल याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करता आला असता. या घटनेनंतर अरुणा ४२ वर्षे कोमात होती. त्यामुळे आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात काही अर्थ नाही, असे कुलकर्णी यांनी सांगितले. पोलीस आयुक्त राकेश मारिया परदेशी गेल्याने त्यांचा चार्ज कुलकर्णी यांच्याकडे आहे.
अरुणा शानबागच्या नातेवाईकांनी वा केईएम रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी खटला पुढे चालवण्याची मागणी केल्यास तुम्ही नवी तक्रार दाखल कराल काय, असे विचारले असता कुलकर्णी म्हणाले, त्यांनी तक्रार दाखल करण्याची मागणी केली तर परिस्थिती वेगळी असेल, त्यावेळी काय निर्णय घेतला जाईल हे आता सांगू शकत नाही.
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या मते ४२ वर्षांपूर्वी घडलेल्या अत्याचारामुळे अरुणा शानबागचा आता मृत्यू झाला हे पोलिसांना सिद्ध करता येणार नाही. त्यामुळे नवा गुन्हा दाखल करण्यात काही अर्थ नाही. प्रसिद्ध वकील मजीद मेमन यांनीही मुंबई पोलिसांप्रमाणेच मत व्यक्त केले. अत्याचाराच्या त्या घटनेनंतर अनेक वर्षे जगून अरुणाचा नैसर्गिक मृत्यू झाला. त्यामुळे अरुणाच्या मृत्यूचा परिणाम या केसवर होणार नाही.

अरुणा शानबागचा १८ मे रोजी मृत्यू झाला. १९७३ साली कनिष्ठ परिचारिका म्हणून केईएम रुग्णालयात काम करत असताना तेथील वॉर्डबॉय सोहनलाल भारत वाल्मीकी याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या घटनेनंतर अरुणा कोमात गेली. सोहनलालवर चोरी व खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप लावण्यात आला. तिच्यावर बलात्कार झाल्याची घटना केईएमचे डीन डॉ. देशपांडे यांच्या सूचनेनुसार लपवण्यात आली. कदाचित शानबागवर सामाजिक आरोप होऊ नयेत वा तिच्या ठरलेल्या विवाहात अडचणी येऊ नयेत म्हणून हा निर्णय घेतला असावा.

Web Title: Aruna Shanbagh case file closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.