Join us

सन्मानासाठी कलावंतांची फरपट; तारीख ठरूनही सांस्कृतिक पुरस्कार सोहळा दोन वेळा झाला रद्द

By दीपक भातुसे | Updated: March 27, 2023 08:20 IST

अमित देशमुख सांस्कृतिक कार्यमंत्री असताना एप्रिल, २०२२ मध्ये या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

- दीपक भातुसे  मुंबई : राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या सांस्कृतिक पुरस्कारांचे वितरण करण्यासाठी सांस्कृतिक संचालनालयाला मुहूर्त मिळेना.  पुरस्कार वितरणाची तारीख दोनदा  जाहीर होऊन ती आयत्या वेळी रद्द केल्याने, पुरस्कारप्राप्त कलावंतांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. 

अमित देशमुख सांस्कृतिक कार्यमंत्री असताना एप्रिल, २०२२ मध्ये या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या १२ पुरस्कारांमध्ये विविध लोककलावंतांचा समावेश होता. तेव्हापासून रखडलेल्या या पुरस्कारांचे वितरण सोमवार, २७ मार्च रोजी मुंबईत रवींद्र नाट्य मंदिरात होईल, असा निरोप कलावंतांना देण्यात आला हाेता. काही कलावंत स्वखर्चाने मुंबईतही आले. मात्र, आदल्या दिवशी म्हणजे रविवारी हा सोहळा रद्द झाल्याचा निरोप त्यांना देण्यात आला. 

लोकशाहीर कृष्णकांत जाधव यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. पण वितरणापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पत्नी सुहासिनी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मुंबईत आल्या, पण इथे पोहाेचल्यानंतर सोहळा रद्द झाल्याचा निरोप त्यांना देण्यात आला. यापूर्वी डिसेंबर, २०२२ मध्ये नागपूर येथे हा सोहळा घेण्याचे  ठरले होते.  तेव्हाही हाच प्रकार घडला हाेता.

मागील आठवड्यात सांस्कृतिक विभागातून २७ मार्च रोजी मुंबईत पुरस्कार वितरण सोहळा असल्याचा मेसेज आला. मात्र, रविवारी हा सोहळा रद्द झाल्याचे सांगितले, पुढची तारीख नंतर कळवतो, असेही सांगितले गेले. तमाशा कला महाराष्ट्राचा प्राण आहे, त्याची अशी हेळसांड होत आहे. इतर लोकांना पुरस्कार दिले, पण तमाशाला मागे ठेवले, याचे वाईट वाटते.        - सुरेश काळे, पुरस्कारप्राप्त तमाशा कलावंत.

जो प्रकार झाला, त्याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो. कोणत्याही कलावंताचा अपमान करण्याचा संचालनालयाचा हेतू नव्हता. केवळ तारखेतील गैरसमजुतीमुळे हा प्रकार घडला आहे.    - बिभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय.     

जाहीर पुरस्कारांपैकी विठाबाई जीवनगौरव पुरस्कार १६ मार्च रोजी, तर  महाराष्ट्र भूषण पुरस्कार २४ मार्च रोजी वितरित केेले. इतर पुरस्कार वितरणासाठी मुहूर्त अजूनही मिळालेला नाही. 

टॅग्स :महाराष्ट्र सरकार