२४ लाखांचे सोने घेऊन गिरगावातील कारागीर पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 02:29 IST2018-04-23T02:29:00+5:302018-04-23T02:29:00+5:30
जैन यांनी १६ जानेवारी रोजी मैतीला कार्यालयात बोलावून घेत, रोडियम नेकलेस आणि पेंडन्ट सेट बनविण्याचे काम दिले.

२४ लाखांचे सोने घेऊन गिरगावातील कारागीर पसार
मुंबई : काळबादेवीमधील एका ज्वेलर्स कंपनीकडून दागिने बनविण्यासाठी घेतलेले २४ लाख ६० हजार रुपयांचे सोने घेऊन, ४२ वर्षीय कारागीर पसार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुशांत मैती असे पसार झालेल्या कारागिराचे नाव असून, या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत, एलटी मार्ग पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
चेन्नईमध्ये मुख्य कार्यालय असलेल्या अभिलाषा ज्वेलर्स प्रा. लि. कंपनीची एक शाखा दक्षिण मुंबईतील काळबादेवी परिसरात आहे. या शाखेमध्ये व्यवस्थापक म्हणून संदीप जैन (३८) हे सर्व व्यवहार बघतात. ९ ते १२ फेब्रुवारी दरम्यान गिरगावात असलेल्या दागिन्यांच्या प्रदर्शनामुळे दागिन्यांची मागणी वाढली होती. त्यामुळे तब्बल दोन वर्षांच्या व्यावसायिक ओळखीतून जैन यांनी गिरगावातील भुलेश्वर परिसरात दागिने घडविणाऱ्या सुशांत मैती या कारागिराला मोठे काम देण्याचे ठरविले.
जैन यांनी १६ जानेवारी रोजी मैतीला कार्यालयात बोलावून घेत, रोडियम नेकलेस आणि पेंडन्ट सेट बनविण्याचे काम दिले. यासाठी लागणारे तब्बल २४ लाख ६० हजार रुपये किमतीचे ८०० गॅ्रम फाइन गोल्ड (९९.५०) कागदोपत्री व्यवहार करून त्याच्याकडे सुपुर्द केले. ठरल्याप्रमाणे दागिन्यांच्या प्रदर्शनाच्या दोन दिवस आधी मैती ही आॅर्डर पूर्ण करून दागिने आणून देणार होता. मात्र, याच प्रदर्शनासाठी अन्य सोने व्यापाºयांकडून घेतलेले काम अपूर्ण असल्याचे कारण पुढे करत, त्याने वेळ वाढवून घेतला. जैन हेसुद्धा दागिने प्रदर्शनाच्या कामात व्यस्त होते.
प्रदर्शन संपल्यानंतर चार दिवसांनी जैन यांनी मैतीला फोन केला असता, तो बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मैतीच्या कारखान्यावर आणि माझगाव येथील घरी जाऊन चौकशी केली असता, मैती सोने घेऊन पसार झाल्याचे त्यांना समजले. फसवणूक झाल्याची खात्री पटल्याने, जैन यांनी शनिवारी एलटी मार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. फसवणुकीचा गुन्हा दाखल करत, आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.