‘एआय’ अपरिहार्य होईल, पण...

By मनोज गडनीस | Updated: May 25, 2025 10:23 IST2025-05-25T10:23:21+5:302025-05-25T10:23:21+5:30

आजच्या घडीला आपल्या दैनंदिन आयुष्याच्या सर्व घटकांभोवती आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) फेर धरत आहे.

artificial intelligence will be inevitable but | ‘एआय’ अपरिहार्य होईल, पण...

‘एआय’ अपरिहार्य होईल, पण...

मनोज गडनीस , विशेष प्रतिनिधी

आज जी पिढी वयाच्या ४५-५० वयोगटात आहे, त्या पिढीच्या हाती ते साधारणपणे १८ ते २० वर्षांचे असताना मोबाइल फोन आले. त्यावेळी मोबाइलच्या इनकमिंग आणि आऊटगोईंगसाठी भरघोस पैसे मोजावे लागत होते. त्यामुळे मर्यादित लोकांच्या हातीच फोन होते. पण, दूरसंचार क्षेत्राचा विकास झाला आणि मोबाइल फोन प्रत्येकाच्याच खिशात आले. ज्यावेळी मोबाइल नव्हते, त्यावेळी बहुतांश लोकांना अनेक फोन नंबर मुखोद्गत असायचे. पण, मोबाइल फोनमध्ये जसजसे नंबर साठवले  जाऊ लागले, तसतशी लोकांची न्यूमरिक मेमरी (नंबर आठवण्याची क्षमता) लोप पावत गेली. हा एक मोठा तोटा तंत्रज्ञानामुळे झाला. 

आजच्या घडीला आपल्या दैनंदिन आयुष्याच्या सर्व घटकांभोवती आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) फेर धरत आहे. अनेकांना हे वरदान वाटत आहे. लोकांच्या वेळेत बचत होतानाच अधिक सकस काम होत आहे. मात्र, वयोगटानुसार विचार केला, तर आता विद्यार्थ्यांच्या हाती देखील एआय येत आहे. त्यामुळे हा काहीसा चिंतेचा विषय ठरू पाहत आहे. 

विद्यार्थीदशेत मनाचा विकास आणि मुलांचे भावविश्व विकसित होते. एआयमध्ये जी रेडीमेड माहिती असते त्या माहितीला पूर्वग्रहाची किनार असेल, तर केवळ तंत्रज्ञानाने उत्तर दिले, म्हणजे ते सर्वोत्तम ही गोष्ट मुलांच्या मनावर बिंबू जाऊ शकते. 

ज्या वयामध्ये विविध क्षमता विकसित होत असतात, त्या क्षमता खुंटण्याचा सर्वाधिक धोका असतो. प्रत्येक गोष्टीसाठी जिथे मेंदू वापरावा, अशी अपेक्षा असते तिथे तंत्रज्ञान वापरले जाऊन तंत्रज्ञानावर अवलंबून राहण्याची सवय मुलांना लागू शकते. 

यातील महत्त्वाचा धोका म्हणजे, मुले त्यांना हव्या असलेल्या माहितीसाठी तंत्रज्ञान मागेल ती माहिती त्यांना देऊ शकतात. त्या माहितीचा ते तंत्रज्ञान अन्यत्र कसा वापर करेल हे सांगणे कठीण आहे किंवा भविष्यात त्याच मुलासाठी त्या माहितीचा विपरित वापर होण्याची देखील शक्यता असते. 

विद्यार्थी दशेत या तंत्रज्ञानाचा किती वापर करायला हवा यासाठी शैक्षणिक धोरणात यावर ऊहापोह व्हायला हवा. विश्वाचा आकार केवढा तर ज्याच्या त्याच्या मेंदू एवढा, हे आपण नेहमी ऐकतो. मग अशा अमर्याद मेंदूला आपण तंत्रज्ञानाचे कुंपण किती घालायचे? नर्मदा राधेश्वर, मानसोपचारतज्ज्ञ  

‘एआय’मध्ये एखाद्या मुद्द्याच्या अनुषंगाने माहिती विचारण्यासाठी जी माहिती दिली जाते ती माहिती ‘एआय’ कायम स्वतःमध्ये साठवत असते. त्याच मुद्द्याच्या अनुषंगाने अन्य कुणी  विचारणा केली, तर तुमचे मुद्दे व त्या अनुषंगाने ‘एआय’कडे असलेली माहिती एकत्र करून त्याचे विश्लेषण करून त्यातील सर्वोत्तम माहिती तुमच्यापुढे सादर केली जाते. याचाच अर्थ ढोबळ माहितीतून नेमकी माहिती देण्याचा प्रयत्न ‘एआय’ करते.

पण, या सर्व माहितीचा स्रोत हा माणूसच असतो. संबंधित माहिती ‘एआय’मध्ये भरतेवेळी संबंधित माणसाच्या भाव-भावना, स्वभाव, व्यक्तिमत्व हे त्याद्वारे ‘एआय’मध्ये भरले जाते. ‘एआय’ला भावना नाही. त्यामुळे ते फक्त उणे, अधिक, भागाकार, गुणाकार करून माहिती देते. हे त्याचे ढोबळ स्वरूप. त्यामुळे विद्यार्थीवयात याचा काय परिणाम होईल, याचा आपण अंदाज लावू शकतो. - रवी प्रधान, तंत्रज्ञान विश्लेषक 

Web Title: artificial intelligence will be inevitable but

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.