महेश कोले, प्रतिनिधी
मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकल रेल्वे आजकाल धाप लागल्यासारखी करतेय. मध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्गांवर गेल्या काही दिवसांत जो गोंधळ उडालाय, तो केवळ तांत्रिक अडचणींचा परिणाम नाही; तर तो नियोजनशून्यतेचा आणि प्रवाशांविषयीच्या प्रशासनिक उदासीनतेचा आहे.
एकेकाळी सेकंद काट्यावर धावणारी लोकल हल्ली मिनिटांनी नाही, तर अनेकदा तासभर उशिराने धावत आहे. वेळापत्रकाचे अक्षरशः तीनतेरा वाजले आहेत. प्रवाशांना कोणती गाडी कधी येणार, याचा अंदाजही लागत नाही. “ब्लॉक” हा शब्द आता नियोजित देखभालीसाठी वापरला जात नाही, तर तो प्रवाशांच्या रोजच्या त्रासाचे कारण बनला आहे.
रेल्वे प्रशासन सतत ब्लॉक्स घेते. आठवड्याच्या शेवटीच नव्हे, तर कधीही अचानक ब्लॉक जाहीर केला जातो. अधिकारी म्हणतात, रात्री तीन तास लोकल बंद असते तेव्हादेखील देखभाल दुरुस्तीची कामे केली जातात. मग दिवसा ब्लॉक घेणे गरजेचे आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच या ब्लॉक्सचे नियोजन नेमके कुठे आहे ? प्रवाशांना पर्यायी सेवा देण्याची जबाबदारी कुणाची ? आणि हे ब्लॉक्स घेताना प्रवाशांच्या वेळेचा, त्यांच्या नियोजनाचा विचार केला जातो का ? असा प्रश्न निर्माण होत आहे.
दररोज लाखो मुंबईकर आपला जीव मुठीत धरून प्रवास करतात. ऑफिसला वेळेत पोहोचणे, घरी वेळेत परतणे हे आता त्यांच्या हाती राहिलेले नाही. उशीर, गर्दी, अचानक लोकल रद्द करणे आणि प्लॅटफॉर्म बदलणे या सगळ्यामुळे प्रवाशांचा दिवस अक्षरशः उद्ध्वस्त होतो. हो... ‘उद्ध्वस्त’ हाच शब्द इथे योग्य आहे.
लोकलच्या विलंबामुळे पगारदारांना ऑफिसला पोहोचण्यास उशीर होतो. हे वारंवार घडत असल्याने त्यांना कार्यालयात बोलणी खावी लागतात. अनेकांना घरी परतायलाही उशीर होतो. परिणामी कुटुंबीयांसाठी राखून ठेवलेला वेळही कमी होतो. हा केवळ प्रवासाचा प्रश्न नाही; तर मुंबईकरांच्या जीवनाच्या गुणवत्तेचा, दर्जाचा प्रश्न आहे. या सगळ्या गोंधळाची जबाबदारी रेल्वे प्रशासन घेताना दिसत नाही. काही तांत्रिक कारणे, काही विकासकामे सुरू आहेत, एवढेच स्पष्टीकरण देऊन जबाबदारी झटकण्याचे काम रेल्वे प्रशासन चोखपणे पार पाडत आहे. पण, प्रश्न असा आहे की, विकासकामे प्रवाशांना वेठीस धरूनच का केली जातात? या प्रश्नाचे उत्तर मिळणे अपेक्षित आहे.
प्रवाशांना ग्राहक नव्हे, तुमचे भागीदार समजा!
मुंबई लोकलचा हा विस्कळीत ताल रुळावर आणण्यासाठी केवळ आश्वासने पुरेशी नाहीत. रेल्वेने ब्लॉक्सचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. प्रवाशांना पारदर्शकपणे खरी माहिती देणे, पर्यायी सेवा वाढविणे, प्रवाशांना रिअल-टाइम अपडेट्स देणे... आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रवाशांना ‘ग्राहक’ म्हणून नव्हे, तर ‘भागीदार’ म्हणून वागवण्यावर भर दिला पाहिजे.
Web Summary : Mumbai's local train delays disrupt lives, causing office lateness and reduced family time. Poor planning, lack of transparency, and inadequate alternative services exacerbate passenger woes. Treating commuters as partners, not just customers, is crucial for improving service.
Web Summary : मुंबई की लोकल ट्रेनों में देरी से जीवन अस्त-व्यस्त, कार्यालय में देरी और पारिवारिक समय कम होता है। खराब योजना, पारदर्शिता की कमी और अपर्याप्त वैकल्पिक सेवाएं यात्रियों की परेशानी बढ़ाती हैं। यात्रियों को ग्राहक नहीं, भागीदार मानना सेवा सुधार के लिए महत्वपूर्ण है।