आगमनाचा श्रीगणेशा
By Admin | Updated: August 31, 2015 03:17 IST2015-08-31T03:17:05+5:302015-08-31T03:17:05+5:30
विसर्जनाच्या मिरवणुकीला जसे भक्तांनी रस्ते तुडुंब भरून जातात तसा भक्तांचा सागर रविवारी आगमनाच्या मिरवणुकीलाच उसळला. मुंबापुरीतील

आगमनाचा श्रीगणेशा
मुंबई : विसर्जनाच्या मिरवणुकीला जसे भक्तांनी रस्ते तुडुंब भरून जातात तसा भक्तांचा सागर रविवारी आगमनाच्या मिरवणुकीलाच उसळला. मुंबापुरीतील अनेक महत्त्वाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचे रविवारी मंडपांत आगमन झाले.
सप्टेंबरच्या पहिल्या रविवारी दहीहंडी उत्सव असल्याने मुंबादेवी, खेतवाडी, गिरगाव, चिंचपोकळी, डोंगरी आणि इतर प्रमुख मंडळांनी या महिन्याच्या शेवटच्या रविवारचा मुहूर्त साधत लाडक्या बाप्पांचे स्वागत केले. काही अतिउत्साही भक्त जीव धोक्यात घालून बसवर चढले होते. महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक मंडळाने ड्रेसकोडचा वापर करँत आपले वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न केला. रंगीबेरंगी टी-शर्ट, पांढऱ्या रंगांचे सदरे, मोदीसूट असे नानाविध पेहराव परिधान केलेल्या तरुण-तरुणींनी परळ ते लालबागचे रस्ते सजले होते. दुपारी तीनच्या सुमारास आलेल्या पावसाने काही काळासाठी व्यत्यय आणला. मात्र त्यानंतर पावसाची पर्वा न करता कार्यकर्ते डीजे आणि बँजोच्या तालावर मनमुराद नाचताना दिसले.
ट्रॅफिक जॅम : परळ कार्यशाळेतून बाहेर पडणाऱ्या विशाल गणेशमूर्तींची संख्या दुपारनंतर वाढली. त्यात मुख्यत: गिरगाव आणि खेतवाडीकडे जाणाऱ्या गणपतींची संख्या अधिक होती. करी रोड उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद असल्याने सर्व गणेशमूर्ती चिंचपोकळी उड्डाणपुलावरून जात होत्या. परिणामी तिथे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. उड्डाणपुलाच्या पूर्वेकडे लालबागपर्यंत आणि पश्चिमेकडे ना. म. जोशी मार्गावर लागलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा कमी करताना वाहतूक पोलिसांची मात्र तारांबळ उडाली.
‘चिंतामणी’चे मॅनेजमेंट
आगमन सोहळ््याला अधिक गर्दी खेचण्यासाठी ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ गणेशोत्सव मंडळाने चांगली युक्ती लढवली. कार्यशाळेतील मोठ्या मंडळांचे गणपती गेल्यानंतर सर्वात शेवटी मंडळाने गणेशमूर्ती कार्यशाळेतून बाहेर काढली. सर्वोत्कृष्ट छायाचित्र काढणाऱ्या गणेशभक्ताला पारितोषिक देण्याची घोषणा मंडळाने केली. त्यामुळे अनेक छायाचित्रकारांनी चिंतामणीचे फोटोशूट करण्यासाठी गर्दी केली. शिवाय मंडळाने छापलेले टी-शर्ट लालबाग आणि चिंचपोकळी परिसरात वाटत तरुणाईला आकर्षित केले.
बाप्पाच्या दिमतीला ‘फायर ब्रिगेड’!
भारतमाता चित्रपटगृहासमोरील लालबाग-भायखळा उड्डाणपुलाचा फायबर पार्ट निखळला. तो उड्डाणपुलाखाली लटकत होता.
दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाल्याने परळकडून लालबागला येणाऱ्या मिरवणुकांचा खोळंबा झाला.
त्यावेळी तत्काळ दादर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. उंच शिडीवर चढत कोयत्याच्या साहाय्याने पार्ट तोडून काढत खोळंबलेल्या गणपतींना वाट करून दिली.