मिठी नदीच्या पाणथळ जागी परदेशी पक्ष्यांचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:12 IST2021-01-13T04:12:55+5:302021-01-13T04:12:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : धारावी येथील महाराष्ट्र निसर्ग उद्यानाच्या मागील बाजूस मिठी नदीमध्ये पाणथळ जागी आता परदेशीपक्षी दाखल ...

Arrival of exotic birds at Mithi river bed | मिठी नदीच्या पाणथळ जागी परदेशी पक्ष्यांचे आगमन

मिठी नदीच्या पाणथळ जागी परदेशी पक्ष्यांचे आगमन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : धारावी येथील महाराष्ट्र निसर्ग उद्यानाच्या मागील बाजूस मिठी नदीमध्ये पाणथळ जागी आता परदेशीपक्षी दाखल झाले आहेत. हवामानामध्ये बदल झाला की, पक्षी स्थलांतर करित असतात. यंदा मिठी नदीच्या पाणथळ जागेमध्ये हे पक्षी दाखल झाले आहेत. त्यामध्ये काळ्या शेपटीचा पाणटिवळा, सामन्या तुतारी, ठिपकेवाली तुतारी, काळ्या डोक्याचा कुरव, हुग्लीनचा कुरव, शेकाट्या, सुरय, सामान्य टिलवा, छोटा टिलवा आणि सामान्य पाणलावा असे पक्षी दिसत आहेत. पक्षी निरीक्षणासाठी इच्छुक असेलेल्यांसाठी ही मोठी संधी आहे, असे उद्यानातील सहायक कार्यक्रम अधिकारी युवराज पाटील यांनी सांगितले आहे.

उत्तर गोलार्धातल्या कडाक्याच्या थंडीपासून स्वत:चा जीव वाचविण्यासह अन्नाच्या शोधात स्थलांतरित पक्षी हिमालय ओलांडून आता महाराष्ट्रासह भारतात मुंबईत दाखल होतात. येथे दाखल झालेल्या स्थलांतरित पक्ष्यांचा मुक्काम किमान सहा महिने तरी असतो. दक्षिण गोलार्धाच्या तुलनेत उत्तर गोलार्धात अधिक थंडी असते. यापासून वाचण्यासह जगण्यासाठी पक्षी मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित होत असून, भारतात स्थलांतरित होणाऱ्या प्रजाती सुमारे २३० तर महाराष्ट्रात ६०च्या आसपास आहेत. जेथे जास्त पाणी तेथे अन्नाची उपलब्धता जास्त असते. अन्न जास्त असेल, तर पक्ष्यांची संख्या वाढते.

स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनाची महाराष्ट्रातही काही ठिकाणे असून, या ठिकाणांमध्ये नांदूर मधमेश्वर (नाशिक जिल्हा), हतनूर जलाशय (जळगाव जिल्हा), ठाणे खाडी (ठाणे जिल्हा), शिवडी समुद्रकिनारा (मुंबई), कोकणातले विविध समुद्रकिनारे उदा.अर्नाळा, वसई, मुंबईचा परिसर, उरण, अलिबाग, मुरुड, गंगापूर धरणाचा परिसर (नाशिक जिल्हा), जायकवाडी धरणाचा परिसर (अहमदनगर तथा औरंगाबाद), कोयना अभयारण्य (सातारा), कर्नाळा अभयारण्य (रायगड), नवेगाव धरणाचा प्रदेश (भंडारा आणि गोंदिया जिल्हा), तुंगारेश्वर अभयारण्य (ठाणे जिल्हा), तानसा अभयारण्य (ठाणे जिल्हा), सोलापूर जिल्ह्यातील अनेक धरणे, तलाव व बंधारे, उजनी धरणाचा प्रदेश (पुणे व सोलापूर जिल्हा) यांचा समावेश होतो.

-----------------------------

- समुद्रकिनारा, खाडीसारख्या प्रदेशात स्थलांतरित पक्षी आढळतात.

- पाणथळ जागांवर स्थलांतरित पक्षी आढळतात. धरणालगतच्या पाणी अडविण्याच्या भागात स्थलांतरित पक्षी आढळतात.

- काही पक्षी प्रजननासाठी येतात. मात्र, हे प्रमाण कमी आहे.

-----------------------------

Web Title: Arrival of exotic birds at Mithi river bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.