CoronaVirus News: चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा यंदा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 01:49 IST2020-06-17T01:49:36+5:302020-06-17T01:49:43+5:30
मंडपातच घडणार मूर्ती; आॅनलाइन दर्शन

CoronaVirus News: चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा यंदा रद्द
मुंबई : मुंबईतील सर्वात मोठा आगमन सोहळा तसेच आगमनाधीश अशी ख्याती असलेला चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा यंदा रद्द करण्यात आला आहे.
चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ यंदा १०१व्या वर्षात पदार्पण करत आहे. परंतु कोरोनाच्या संसर्गामुळे देशभरात संकटजन्य परिस्थिती उद्भवली आहे. यंदाच्या गणेशोत्सव काळात पोलिसांवर अतिरिक्त ताण नको यासाठी मंडळाने हा आगमन सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच शासनाने घालून दिलेल्या नियमानुसारच मूर्तीची उंची ठेवून ती मूर्ती चिंचपोकळी येथील मंडपातच घडविण्याचा निर्णय मंडळातर्फे घेतला गेला आहे. यासाठी मूर्तिकार रेशमा विजय खातू यांनीही तयारी दर्शविली आहे.
चिंतामणीचा पाटपूजन सोहळा देखील ठरावीक पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांच्या उपस्थितीत साधेपणाने करण्यात येणार आहे. भव्य सजावट व रोषणाई न करता रुग्णालयांना वैद्यकीय उपकरणे तसेच गरजू रुग्णांसाठी उपयोगी साहित्याचे वाटप केंद्र सुरू करण्यात येणार आहे. असे मंडळाचे अध्यक्ष उमेश नाईक यांनी सांगितले. तसेच गणेशोत्सवात विभागातील वर्गणीदारांव्यतिरिक्त इतर भाविकांना मुखदर्शन घेता येणार नाही. परंतु बाप्पाचे आॅनलाइन दर्शन असेल. त्यामुळे उत्सव काळात भक्तांनी गर्दी न करण्याचे आवाहन मानद सचिव वासुदेव सावंत यांनी केले.