अर्णब गोस्वामी यांनी टीआरपीसाठी दिले १२ हजार डॉलर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:29 IST2021-02-05T04:29:05+5:302021-02-05T04:29:05+5:30
पार्थो दासगुप्ताचा लेखी जबाब : गुन्हे शाखेकडून ठोस पुरावे न्यायालयात सादर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : टीआरपी घोटाळ्याचा मास्टरमाइंड ...

अर्णब गोस्वामी यांनी टीआरपीसाठी दिले १२ हजार डॉलर
पार्थो दासगुप्ताचा लेखी जबाब : गुन्हे शाखेकडून ठोस पुरावे न्यायालयात सादर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : टीआरपी घोटाळ्याचा मास्टरमाइंड असलेला ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिलचा (बार्क) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पार्थो दासगुप्ताने पोलिसांना दिलेल्या लेखी जबाबात, टीआरपीसाठी रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याकडून त्यांना १२ हजार डॉलर मिळाल्याचे नमूद केले आहे. याशिवाय, दोन विशेष सुट्यांसह तीन वर्षांत एकूण ४० लाख रुपये मिळाल्याचेही त्यांनी कबूल केले. यामुळे गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
दासगुप्ताने गोस्वामी यांच्यासोबत संगनमत करून कट रचत टीआरपी घोटाळा केल्याचा आरोप गुन्हे शाखेने पुरवणी आरोपपत्राद्वारे केला. या आरोपांशी निगडित ठोस पुरावे हाती लागले असून, ते आरोपपत्रासह सत्र न्यायालयात सादर केल्याचेही गुन्हे शाखेने स्पष्ट केले. टीआरपी घोटाळ्याप्रकरणी गुन्हे शाखेने आतापर्यंत १५ आरोपींना अटक केली. त्यापैकी १२ जणांविराेधात याआधी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. ११ जानेवारी रोजी दासगुप्ता यांच्यासह बीएआरसीचे सीओओ रोमील रामगडिया आणि एआरजी आऊटलायर कंपनीचे सीईओ विकास खानचंदानी यांच्याविरोधात गुन्हे शाखेने ३६०० पानांचे पुरवणी आरोपपत्र सादर केले.
याच आरोपपत्रात दासगुप्ता याच्या जबाबाचाही समावेश आहे. यात, त्याने ‘अर्णब गोस्वामी यांना २००४ पासून ओळखत असून, आम्ही टाइम्स नाऊमध्ये सोबत काम करीत होतो. मी बार्कचा सीईओ म्हणून २०१३ मध्ये काम सुरू केले होते आणि अर्णब गोस्वामी यांनी २०१७ मध्ये रिपब्लिक चॅनल सुरू केले होते. रिपब्लिक चॅनल सुरू करण्याअगोदर त्यांनी माझ्याशी अनेकदा चर्चा केली, तसेच त्यांना टीआरपीबाबत माहिती होती. त्यानुसार, रिपब्लिक टीव्हीला क्रमांक एकची रेटिंग मिळावी, यासाठी मी त्यांच्या टीमसोबत काम करायचो व टीआरपीमध्ये फेरफार करायचो. हे जवळपास २०१७ पासून २०१९ पर्यंत सुरू होते. २०१७ मध्ये अर्णब गोस्वामी यांनी मला माझ्या कुटंबासोबतच्या फ्रान्स व स्वीत्झर्लंडच्या सहलीसाठी जवळपास ६ हजार डॉलर दिले. त्यानंतर २०१९ मध्ये पुन्हा तेवढीच रक्कम दिली. २०१७ मध्येही गोस्वामी यांनी माझी भेट घेतली आणि मला २० लाखांची राेकड दिली. २०१८ व २०१९ मध्ये त्यांनी मला भेटल्यानंतर प्रत्येकवेळी १० लाख, असे एकूण ४० लाख रुपये दिले,’ असे दासगुप्ताने जबाबात नमूद केले आहे.
..................