सेना-मनसे वायफाय वाद विकोपास
By Admin | Updated: July 5, 2014 09:08 IST2014-07-05T03:57:50+5:302014-07-05T09:08:13+5:30
पालिका निवडणुकीत मनसेने शिवसेनेला दणका दिल्यापासून दादर पश्चिम, शिवाजी पार्क हा उभय पक्षांसाठी प्रतिष्ठेचा विभाग बनला आहे़

सेना-मनसे वायफाय वाद विकोपास
मुंबई : शिवाजी पार्कवर पहिला वायफाय कोणाचा यावरून शिवसेना-मनसेमध्ये चांगलीच जुंपली आहे़ वायफायचे श्रेय मनसेच्या पदरात पडू नये यासाठी हे खोदकाम बेकायदेशीर ठरवून मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांच्यावर एफआयआर दाखल करण्याचे आदेश महापौरांनी आज दिले़ मात्र खुशाल गुन्हा दाखल करा, पण वायफाय मनसेच लावणार, असे आव्हान देशपांडे यांनी दिले आहे़
पालिका निवडणुकीत मनसेने शिवसेनेला दणका दिल्यापासून दादर पश्चिम, शिवाजी पार्क हा उभय पक्षांसाठी प्रतिष्ठेचा विभाग बनला आहे़ त्यामुळे येथे प्रकल्प राबविण्यावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद रंगत आले आहेत़ यापूर्वी शिवाजी पार्कवरील रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वाद पेटला होता़ तर या वेळेस दादरवासीयांना हायफाय सेवा देण्यावरून सेना-मनसे आमने-सामने आले आहेत़ देशपांडे यांनी शिवाजी पार्कवर वायफाय सुविधेसाठी केबल्स टाकण्याकरिता खोदकामास सुरुवात केली आहे़ याची कुणकुण लागताच जी दक्षिण वॉर्डाचे अधिकारी त्या ठिकाणी गेले असता देशपांडे यांच्याशी त्यांची बाचाबाची झाली़ मनसे गटनेता थेट आव्हानच देत असल्याने शिवसेनेचे पित्त चांगलेच खवळले आहे़ देशपांडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या श्रद्धा जाधव यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे केली़
शिवसेना-मनसेमध्ये सुरू असलेल्या वायफाय वादात आता काँग्रेसनेही उडी घेतली आहे़ या सुविधेमुळे मुंबईच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होत असल्याने सायबर नियमांचे पालन करून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळाल्याशिवाय हा प्रकल्प राबविल्यास तो बेकायदेशीर ठरेल़ याविरोधात काँग्रेसचा मोर्चा महापालिकेवर धडकेल, असा सज्जड इशारा मुंबई विभागीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष जनार्दन चांदूरकर यांनी दिला आहे़ (प्रतिनिधी)