सेना-मनसेने केली शेलारांची कोंडी

By Admin | Updated: October 11, 2014 03:41 IST2014-10-11T03:41:27+5:302014-10-11T03:41:27+5:30

वांद्रे पश्चिमेत काँग्रेस आ. बाबा सिद्दिकी आणि भाजपाचे आशिष शेलार यांच्यातील थेट लढत यंदा मनसे व शिवसेनेमुळे रंगतदार बनली आहे

Army-MNS has taken shelter of Shelar | सेना-मनसेने केली शेलारांची कोंडी

सेना-मनसेने केली शेलारांची कोंडी

मुंबई : वांद्रे पश्चिमेत काँग्रेस आ. बाबा सिद्दिकी आणि भाजपाचे आशिष शेलार यांच्यातील थेट लढत यंदा मनसे व शिवसेनेमुळे रंगतदार बनली आहे. मात्र, मराठी मतांच्या विभाजनामुळे शेलार यांना फटका बसण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात २००९ साली शेलार यांनी चांगली लढत दिली. अवघ्या सोळाशे मतांनी काँग्रेस आ. बाबा सिद्दिकी यांनी त्यांचा पराभव केला होता. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या पूनम महाजनांनी येथून प्रिया दत्त यांच्याविरोधात तब्बल २९ हजारांची आघाडी घेतली. त्यामुळे पराभवाची परतफेड करण्याच्या तयारीत असणाऱ्या शेलारांच्या मनसुब्यांवर शिवसेना-मनसे उमेदवारांनी पाणी फेरले आहे.
शिवसेनेकडून विलास चावरी आणि मनसेकडून तुषार आफळे या उमेदवारांनी मतदारसंघात प्रचाराची आघाडी उघडली आहे. खारदांडा परिसरात चावरी यांचा प्रभाव असून आफळे यांच्यामागे मनसेचा मतदार आहे. या दोन्ही उमेदवारांमुळे मराठी मतांमध्ये होणारी विभागणी शेलारांना जड जाणार आहे.
मराठी, मुस्लीम आणि ख्रिश्चन मतदार येथे मोठ्या प्रमाणावर आहे. गेल्या वेळी मुख्यत्वे मराठी आणि काही प्रमाणात ख्रिश्चन मतांनी शेलारांना हात दिला. यंदा मात्र मराठी मते त्यांच्या विरोधात जाण्याची चिन्हे आहेत.
सध्या मुंबईत मराठी अस्मितेचा मुद्दा गाजत आहे. शेलार यांनी
मुस्लीम व ख्रिश्चन मतांच्या राजकारणासाठी केलेली वकिली आणि मराठी अस्मितेकडचे दुर्लक्ष त्यांना महागात पडण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Army-MNS has taken shelter of Shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.