सेना नेत्यांचा जनतेशी संपर्क तुटला

By Admin | Updated: February 22, 2015 01:21 IST2015-02-22T01:21:43+5:302015-02-22T01:21:43+5:30

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व खासदारांचा नवी मुंबईतील सामान्य जनतेशी संपर्क तुटला आहे. दोन्ही नेत्यांनी शहरात अद्याप जनसंपर्क कार्यालयही सुरू केलेले नाही.

Army leaders lose contact with the public | सेना नेत्यांचा जनतेशी संपर्क तुटला

सेना नेत्यांचा जनतेशी संपर्क तुटला

नामदेव मोरे ल्ल नवी मुंबई
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व खासदारांचा नवी मुंबईतील सामान्य जनतेशी संपर्क तुटला आहे. दोन्ही नेत्यांनी शहरात अद्याप जनसंपर्क कार्यालयही सुरू केलेले नाही. दोन्ही नेते सर्व जनतेचे आहेत की फक्त शिवसैनिकांचे, असा प्रश्न उपस्थित होत असून यांच्यापेक्षा पूर्वीचे पालकमंत्री व खासदार परवडले, असे मत व्यक्त केले जात आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये नवी मुंबईतील नागरिकांनी शिवसेनेच्या पारड्यात भरभरून मते टाकली. ऐरोली व बेलापूर मतदारसंघातून तब्बल ४६ हजारांचे मताधिक्य राजन विचारे यांना मिळाले. या निवडणुकीमुळे अनेक वर्षांच्या गणेश नाईक यांच्या सत्तेला पहिला धक्का बसला आहे. यानंतर विधानसभा निवडणुकीत सेनेला अपयश आले असले तरी त्यांच्या उमेदवारांनाही लोकसभेप्रमाणे भरभरून मते मिळाली. नागरिकांनी नाईकांना पराभूत केले. सद्यस्थितीमध्ये खासदार व पालकमंत्री शिवसेनेचे आहेत. यामुळे विकासकामांना गती मिळेल व सामान्य जनतेची कामे मार्गी लागतील, अशी अपेक्षा निर्माण झाली होती. खासदारांनी शहरातील रेल्वे स्थानकांची पाहणी करून सानपाडा दत्तमंदिर व इतर प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. दगडखाण मालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. शिवसेनेच्या कार्यक्रमांना ते हजेरी लावत आहेत. परंतु जवळपास एक वर्ष होत आले तरी त्यांनी अद्याप जनसंपर्क कार्यालय सुरू केलेले नाही. यामुळे सामान्य नागरिकांनी त्यांना भेटायचे कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सेना पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. परंतु त्यांचेही संपर्क कार्यालय शहरात नसल्याने शिवसैनिकांव्यतिरिक्त इतर नागरिकांना त्यांना भेटता येत नाही.
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असताना गणेश नाईक यांनी दहा वर्षे जनता दरबार सुरू ठेवला होता. विष्णुदास भावे नाट्यगृहात प्रत्येक आठवड्यात ते सर्व नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या सोडवत होते. या व्यतिरिक्त बालाजी गार्डन या निवासस्थानी व व्हाईट हाऊस या कार्यालयात नागरिकांना भेटत होते. संजीव नाईक खासदार असतानाही त्यांनी नवी मुंबई, ठाणे, मीरा-भार्इंदरमध्ये जनसंपर्क कार्यालये सुरू करून जास्तीत जास्त नागरिकांना भेटण्यावर लक्ष दिले होते. विद्यमान खासदार व मंत्र्यांची भेट घेण्यापूर्वी प्रथम शिवसैनिकांची भेट घ्यावी लागत आहे. जनता दरबार बंद झाला आहे. सार्वजनिक कार्यक्रमात घाईगडबडीत त्यांना निवेदन द्यावे लागत आहे. यामुळे पूर्वीचे खासदार व मंत्री बरे होते किमान ते सर्वांना नियमित भेटत होते, असे मत व्यक्त केले जात आहे. खासदार व पालकमंत्र्यांनी शहरात जनसंपर्क कार्यालय सुरू करावे व नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठीची यंत्रणा तयार करण्याची मागणी होत आहे. दरम्यान खासदार राजन विचारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

च्शिवसेनेचे बेलापूर विधानसभा संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे यांनी सांगितले की, आमचे नेते दिखावेगिरी करत नाहीत. प्रत्यक्ष काम करण्यावर भर देतात. यापूर्वीच्या नेत्यांनी फक्त दरबार घेतले पण तिथे कामे झाली नाहीत. विद्यमान खासदारांनी सानपाडा दत्तमंदिर पादचारी पुलाचा प्रश्न मार्गी लावला. रेल्वेच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
च्पालकमंत्रीही नवी मुंबईसाठी जास्तीत जास्त वेळ देत आहेत. उलट पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी अद्याप सभागृहात त्यांचा सत्कारही घेतला नाही. शहरवासीयांसाठी जनसंपर्क कार्यालयही लवकरच सुरू करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्र्यांचा लेटलतिफ कारभार
च्ठाणे जिल्ह्णाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लेटलतिफ कारभारामुळे शिवसैनिकही त्रस्त झाले आहेत. विष्णुदास भावे नाट्यगृहात २३ जानेवारीला झालेल्या पहिल्याच सत्कार सोहळ्यास मंत्री तब्बल चार तास उशिरा आले. नागरिकांना थांबविण्यासाठी पदाधिकाऱ्यांना कविता व गीते सादर करावी लागली होती.
च्नेरूळमध्ये झालेल्या मेळाव्यासही मंत्री उशिरा पोहचले होते. शुक्रवारी विष्णुदास भावे नाट्यगृहातील कार्यक्रमामध्येही मंत्री उशिरा पोहचले होते. कंटाळलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी घरी जाणे पसंत केले. उशिरा येण्याच्या सवयीमुळे नागरिकांसह शिवसैनिकही त्रस्त झाले आहेत.

Web Title: Army leaders lose contact with the public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.