जिल्ह्यात सेनेची आघाडी

By Admin | Updated: October 21, 2014 00:05 IST2014-10-21T00:05:22+5:302014-10-21T00:05:22+5:30

रायगड जिल्ह्यातील सातही मतदार संघांतील निवडणुकीत कोण किती पुढे आणि कोण किती मागे हे स्पष्ट झालेले आहे.

Army lead | जिल्ह्यात सेनेची आघाडी

जिल्ह्यात सेनेची आघाडी

जयंत धुळप, अलिबाग
रायगड जिल्ह्यातील सातही मतदार संघांतील निवडणुकीत कोण किती पुढे आणि कोण किती मागे हे स्पष्ट झालेले आहे. जिल्ह्यातील एकूण १९ लाख ७६ हजार २७२ मतदारांपैकी, १८.९८ टक्के म्हणजे ३ लाख ७५ हजार २९० अशी सर्वाधिक मते घेणारा प्रथम क्रमांकाचा पक्ष उरण व महाडमध्ये विजयाची मोहोर उमटवणारा शिवसेना हा पक्ष ठरला आहे. महाडबरोबर उरणमध्ये देखील शिवसेनेची ताकद आहे, हे यावेळी सेनेने सिद्ध केले आहे.
शेकाप दुस-या क्रमांकावर
अलिबाग व पेण विधानसभा मतदार संघात आपल्या विजयाची मोहोर उमटवणारा शेतकरी कामगार पक्ष जिल्ह्यातील द्वितीय क्रमांकाची सर्वाधिक मते घेणारा राजकीय पक्ष ठरला आहे. एकूण मतदारांपैकी शेतकरी कामगार पक्षाने १५.९० टक्के म्हणजे ३ लाख १४ हजार ४०७ मते मिळवली आहेत. उरण विधानसभा मतदार संघातील विवेक पाटील यांची खात्रीची व हक्काची जागा यावेळी शेकापला राखता आली नाही, त्यामुळे त्यांच्या मतसंख्येमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे.
काँग्रेसची घसरण
एकेकाळी रायगड जिल्ह्यातील सर्व सत्तास्थानांवर असल्याने, अत्यंत बलाढ्य पक्ष राहिलेल्या काँग्रेसला यावेळी जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदार संघात एकाही जागी आपला उमेदवार निवडून आणता आला नाही. जिल्ह्यातील काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांनी आपला पक्ष सोडून अन्य पक्षास मतदान केले नसल्याने, जिल्ह्यातील तृतीय क्रमांकाची ११.७८ टक्के म्हणजे २ लाख ३२ हजार ९२२ मते काँग्रेस पक्षाला मिळू शकली आहेत.
भाजपाची ‘झाकली मूठ’
युतीमुळे सातत्याने जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’च राहात असे, परंतु यावेळी भाजपा स्वतंत्र लढल्याने जिल्ह्यात चौथ्या क्रमांकावर आपला पक्ष असल्याचे त्यांना लक्षात आले आहे. भाजपाने जिल्ह्यातील एकूण मतदारांपैकी १०.१५ टक्के म्हणजे २ लाख ६३१ मते मिळवून आपले चौथ्या क्रमांकावर स्थान राखले आहे. प्रशांत ठाकूर यांच्या रुपात भाजपाला नवसंजीवनी मिळाली आहे.
राष्ट्रवादी पाचव्या स्थानावर
महत्त्वाची सत्तास्थाने उपभोगलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने संघटनात्मक वाढ अपेक्षेप्रमाणे केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांच्या तुलनेत शेवटच्या म्हणजे पाचव्या स्थानावर जावून बसावे लागले. कर्जत आणि श्रीवर्धनमध्ये विजयाची मोहोर जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमटवली तरी श्रीवर्धन या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात त्यांचे पुतणे अवधूत तटकरे केवळ ७७ मतांनी विजयी होणे ही धोक्याची घंटा आहे.

Web Title: Army lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.