नगराध्यक्षपदांसाठी सेनेची मोर्चेबांधणी
By Admin | Updated: April 27, 2015 22:36 IST2015-04-27T22:36:48+5:302015-04-27T22:36:48+5:30
अंबरनाथ पालिकेच्या निवडणूक निकालानंतर सत्तेच्या जवळ असलेल्या शिवसेनेने अपक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापनेसाठी मोट बांधण्याची तयारी केली आहे.

नगराध्यक्षपदांसाठी सेनेची मोर्चेबांधणी
पंकज पाटील ल्ल अंबरनाथ
अंबरनाथ पालिकेच्या निवडणूक निकालानंतर सत्तेच्या जवळ असलेल्या शिवसेनेने अपक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापनेसाठी मोट बांधण्याची तयारी केली आहे. मात्र, नगराध्यक्षपद हे अनुसूचित जातीच्या (एससी) महिलांसाठी आरक्षित असल्याने हे पद शिवसेनेच्या नगरसेविकेला मिळणार की, पाठिंबा देणाऱ्या नगरसेविकेला, याची उत्सुकता आला शिगेला पोहोचली आहे. बदलापुरात नगराध्यक्षपदासाठी वामन म्हात्रे यांचेच नाव पुढे आहे.
अंबरनाथमध्ये शिवसेनेने २६ जागा मिळवित सत्तेसाठी आवश्यक असलेल्या २९ या आकड्याशी जवळीक साधली आहे. तीन अपक्षांचे सहकार्य घेऊन सत्ता समीकरण त्यांनी तयार केले आहे. नगराध्यक्षपदाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी देत असले तरी यासंदर्भातील निर्णय जिल्हा संपर्कप्रमुख आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे हेच घेणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या पडलेल्या तीन गटांना एकत्र ठेवण्याच्या अनुषंगाने नगराध्यक्षपद कोणाला देणार, हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. एससी महिलेसाठी ही जागा आरक्षित असून सेनेचे त्या प्रवर्गातील दोनच उमेदवार निवडून आले आहेत. त्यात प्रभाग क्रमांक १८ मधून छाया दिवेकर तर, ४० मधून प्रज्ञा बनसोडे यांचा समावेश आहे. पक्षाचा विचार करून नगराध्यक्षपद दिल्यास दिवेकर आणि बनसोडे यांच्यापैकी एका नगरसेविकेला नगराध्यक्षपद मिळणार आहे. तसेच ज्या अपक्षांची मदत शिवसेना घेण्याच्या तयारीत आहे, त्यातील दोन एससी महिलांचाही या घोडदौडीत समावेश आहे. त्यात प्रभाग क्रमांक २५ मधून जयश्री कांबळे, तर २६ मधून हिराबाई जाविर यांच्या नावांची चर्चा आहे.
या चार नगरसेविकांपैकी कुणाच्या वाट्याला नगराध्यक्षपद जाणार, हे निवडणुकीच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. दुसरीकडे अपक्षांची मदत घेऊन सत्ता स्थापन करताना कोणता घातपात होणार नाही, याची काळजीही शिवसेनेकडून घेतली जात आहे. भविष्यात बंडखोरी टाळण्यासाठी इतर कोणत्या पक्षाची मदत घेता येणार का, याबाबतही सेनेच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. त्यात सत्ता स्थिर ठेवण्याच्या विचाराने भाजपाची मदत मिळेल का, याची चाचपणी सेना करीत आहे.
बदलापुरात शिवसेनेला पूर्ण बहुमत असल्याने नगराध्यक्षपदावर वामन म्हात्रे यांची निवड होण्याची शक्यता आहे. पालिकेची निवडणूक ही कथोरे विरुद्ध म्हात्रे अशीच रंगली होती.
उपनगराध्यक्षपदासाठी अनेक इच्छुक आहेत. त्यातच, बदलापूर पालिकेला ‘अ’ वर्ग दर्जा मिळाल्याने विषय समितीच्या सभापतीपदाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, हे पद आपल्या पदरात पाडून घेण्याची तयारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी सुरू केली आहे.