भांडुपमध्ये सेना, भाजपा कार्यकर्ते नाराज

By Admin | Updated: September 29, 2014 03:57 IST2014-09-29T03:57:36+5:302014-09-29T03:57:36+5:30

पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांना अपेक्षित असलेली नावे डावलून भलत्यांनाच उमेदवारी दिल्याने भांडुपमध्ये शिवसेना आणि भाजता प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.

Army in Bhandup, BJP activists upset | भांडुपमध्ये सेना, भाजपा कार्यकर्ते नाराज

भांडुपमध्ये सेना, भाजपा कार्यकर्ते नाराज

जयेश शिरसाट, मुंबई
पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांना अपेक्षित असलेली नावे डावलून भलत्यांनाच उमेदवारी दिल्याने भांडुपमध्ये शिवसेना आणि भाजता प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिवसैनिकांनी तर आपल्या उमेदवाराने अपक्ष उभे राहावे, यासाठी शक्तिप्रदर्शन करीत पक्षाने दिलेल्या उमेदवाराला उघडपणे विरोध केला. या घडामोडीमुळे भांडुपमधील पंचरंगी लढतीत उत्सुकता निर्माण झाली आहे.
शिवसेनेकडून नगरसेवक रमेश कोरगावकर हे नाव आघाडीवर होते. मात्र त्यांच्याऐवजी अशोक पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. त्यामुळे संतापलेले शिवसैनिक पक्षाचा राजीनामा देण्याच्या पवित्र्यात होते. काल सकाळी मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक गाढवनाका येथील शिवसेना शाखेजवळ जमले. यावेळी शिवसैनिकांनी पाटील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच कोरगावकर यांना अपक्ष अर्ज भरण्यासाठी, स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी गळ घातली. मात्र कोरगावकर यांनी ती अमान्य केली. गेल्या तीन महापालिका लढतींमध्ये शिवसेनेने कोरगावकर यांना वेगवेगळ्या मतदारसंघांतून लढतीसाठी उतरवले. तिन्हींमध्ये त्यांनी विजय मिळवला होता. पाटील हेही शिवसेनेचे नगरसेवक आहेत. मात्र त्यांचा अर्धाअधिक मतदारसंघ भांडुप विधानसभा क्षेत्राबाहेर मोडतो.
भांडुपमधील राजकारणात कोरगावकर, पाटील हे प्रतिस्पर्धी मानले जातात. मात्र भांडुपमधील बहुतांश सर्व शाखाप्रमुखांचा कोरगावकर यांच्यावर विश्वास आहे. हे सर्व पदाधिकारी कोरगावकर निवडणूक लढणार या विचाराने तयारीत होते. मात्र आयत्यावेळी ज्येष्ठ नेते अ‍ॅड. लीलाधर डाके यांनी पाटील यांच्या उमेदवारीसाठी बंगल्यावर ठाण मांडले. डाके यांच्या आग्रहापोटी बंगल्यावर कोरगावकर यांच्या नावावर काट मारून पाटील यांना एबी फॉर्म देण्यात आला, अशी माहिती सूत्रांकडून मिळते. पाटील यांनी उमेदवारीअर्ज भरला तेव्हा मोजकेच कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते.
दरम्यान, भारतीय जनता पक्षानेही तालुकाध्यक्ष जितेंद्र घाडीगावकर यांना डावलून मुलुंडचे नगरसेवक, महापालिकेतील गटनेते मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर केली. युती तुटल्यानंतर भांडुपमधून उमेदवारीच्या स्पर्धेत घाडीगावकर पहिल्या क्रमांकावर होते तर कोटक मुलुंडमधून इच्छुक होते. मुलुंडमध्ये ज्येष्ठ नेते तारासिंग यांच्यामुळे कोटक यांची डाळ शिजू शकली नव्हती. तारासिंग यांचे वय आणि प्रकृतीमुळे मध्यंतरी भाजपामध्ये ताज्या दमाच्या उमेदवाराची चाचपणी सुरू होती. हे लक्षात घेत खासदार किरीट सोमय्या यांच्या विश्वासू असलेल्या कोटक यांनी उमेदवारीसाठी जोर लावला होता. मात्र पक्ष तारासिंग यांच्यावरच जबाबदारी सोपविणार, हे लक्षात येताच कोटक यांनी भांडुप किंवा विक्रोळी असा हट्ट धरला, असे सूत्रांकडून समजते. त्यांचा हट्ट आणि खासदारांचा दबाव यापुढे अखेर पक्षाने घाडीगावकर यांचा बळी घेत कोटक यांना भांडुप या मराठीबहुल मतदारसंघातून उमेदवारी देऊ केली.
या पार्श्वभूमीवर सेना, भाजपा या दोन्ही पक्षांना कार्यकर्त्यांच्या नाराजीचा फटका निवडणुकीत बसू शकतो. कोरगावकर, घाडीगावकर गेले दोन दिवस नॉट रिचेबल आहेत.

Web Title: Army in Bhandup, BJP activists upset

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.