एलबीटीसाठी सल्लागारांची फौज

By Admin | Updated: January 1, 2015 03:06 IST2015-01-01T03:06:51+5:302015-01-01T03:06:51+5:30

एलबीटी जाणार असल्याने शहरातील व्यापाऱ्यांनीदेखील एलबीटी भरण्यास नकार दिला असला तरी पालिका मात्र एलबीटीचे उत्पन्न वाढावे म्हणून सल्लागार नियुक्त करणार आहे.

Army of Advisors for LBT | एलबीटीसाठी सल्लागारांची फौज

एलबीटीसाठी सल्लागारांची फौज

ठाणे : एलबीटी जाणार असल्याने शहरातील व्यापाऱ्यांनीदेखील एलबीटी भरण्यास नकार दिला असला तरी पालिका मात्र एलबीटीचे उत्पन्न वाढावे म्हणून सल्लागार नियुक्त करणार आहे. विशेष म्हणजे या कामी पालिका तब्बल २५ सल्लागारांची नेमणूक करणार असून यासाठी दोन कोटींचा खर्च पालिका त्यांच्यावर करणार आहे. सध्या पालिकेची आर्थिक परिस्थिती ढासळली असताना आता येत्या काही महिन्यांत एलबीटी जाणार असल्याने पुन्हा कोट्यवधींची उधळण कशासाठी, असा सवाल मात्र यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
ठाणे महापालिका हद्दीत एलबीटी लागू झाल्यापासून आतापर्यंत सुमारे १० हजार ९८९ व्यापाऱ्यांनी अर्ज केले आहेत. त्यानुसार पालिकेच्या तिजोरीत आजच्या घडीला ६५० कोटींचे लक्ष अपेक्षित धरून केवळ ३७६ कोटींची वसुली झाली आहे.
त्यामुळे पुढील तीन महिन्यांत पालिकेला सुमारे ३०० कोटींची वसुली करणे अपेक्षित असून सध्या एलबीटी जाणार म्हणून व्यापाऱ्यांनी कर भरण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पालिकेला तोटा सहन करावा लागणार असून, पालिकेचे आर्थिक गणितही कोलमडणार आहे. असे असताना आता एलबीटी जाणे अंतिम टप्प्यात असताना पालिका आता एलबीटीचे उत्पन्न वाढावे यासाठी २५ सल्लागार नेमण्याच्या तयारीत आहे.
सध्या वसई-विरार महापालिकेने आलेल्या अर्जांची छाननी करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती केली आहे. त्यानुसार आता पालिकादेखील तेच पाऊल उचलणार आहे. त्यानुसार पालिकेच्या विधा सल्लागार यांनी प्रस्तावित केल्याप्रमाणे सनदी लेखापाल, वकील, कर सल्लागार आणि शासनाचा विक्रीकर अथवा उप कर विभागात निवृत्त कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आता २५ सल्लागारांची नेमणूक करण्याचे पालिकेने निश्चित केले असून यासाठी तीन वर्षांसाठी २ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

ही कामे करणार : सध्या आलेल्या अर्जांची छाननी करणे, त्यानंतर निर्धारणा आदेश पारित करणे, व्यापाऱ्यांच्या विनंती अर्जाप्रमाणे पुनर्निर्धारणा करणे, निर्धारणा आदेशात दुरुस्ती करणे आदी कामे सध्या करायची आहेत. तसेच एलबीटी ही नवी प्रणाली असल्याने पालिकेच्या कर्मचारी-अधिकारी वर्गाला हे काम करणे शक्य नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

Web Title: Army of Advisors for LBT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.