Join us  

थिएटर, नाटकावाचून आपलं अडलंय काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 1:32 PM

Theater and Drama: अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे कला, साहित्य हे घटक जीवनावश्यक नसल्याने धोरण ठरविताना त्याची फारशी गांभीर्याने नोंद घेतली जात नाही. किंबहुना धोरणांत किंवा निवडणुकीच्या जाहीरनाम्यातही त्याचा फारसा उल्लेख आढळत नाही. हे केवळ आपल्या राज्यात किंवा देशापुरते आहे, असे नाही. तर जगभराच कमी-जास्त प्रमाणात ते दिसून येते.

- योगेश बिडवई (मुख्य उपसंपादक)

अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे कला, साहित्य हे घटक जीवनावश्यक नसल्याने धोरण ठरविताना त्याची फारशी गांभीर्याने नोंद घेतली जात नाही. किंबहुना धोरणांत किंवा निवडणुकीच्या जाहीरनाम्यातही त्याचा फारसा उल्लेख आढळत नाही. हे केवळ आपल्या राज्यात किंवा देशापुरते आहे, असे नाही. तर जगभराच कमी-जास्त प्रमाणात ते दिसून येते.या सर्व कलाप्रकारांसाठी आवश्यक असलेले नाट्यगृह, शहरातील विविध सभागृहे, आर्ट गॅलरी या आपल्या सांस्कृतिक जीवनाच्या त्यामुळेच अविभाज्य घटक आहेत. या वास्तूंची नियमित देखभाल होते आहे की नाही? याकडे  सुजाण नागरिकांचे लक्ष असते.  मध्यंतरी ‘लोकमत’ने ‘नाट्यगृहांची परवड’ या वृत्तमालिकेच्या माध्यमातून नाट्यगृहांचे प्रश्न मांडले होते. नाटक, थिएटरवर सध्या पुन्हा चर्चा करण्याचे कारण म्हणजे जर्मन लेखक चार्ल्स लेविन्स्की यांच्या ‘अडलंय काय?’ या भाषांतरित नाटकाचे शेवटचे काही प्रयोग सुरू आहेत. शौनक चांदोरकर यांनी भाषांतरित केलेल्या निपुण धर्माधिकारी यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकातही ‘नाटक, थिएटर वाचून अडलंय काय?’, असा प्रश्न विचारला आहे. अतुल पेठे यांनी नाट्यकलावंताची भूमिका केली आहे तर पर्ण पेठेे या एका व्यवस्थापन कंपनीच्या प्रतिनिधी दाखविण्यात आल्या आहेत. कोविडसारखे संकट आलेले असते. त्यातून जगभरात मंदी आली आहे. कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये कॉस्ट कटिंग सुरू आहे. सरकारी पातळीवर खर्च कसा वाचवायचा, याचा विचार सुरू आहे. त्यातून एका शहरातील नगरपालिका प्रशासनाला नाट्यगृहाची देखभाल करणे जड झालेले असते. त्यातून नगरपालिकेला सुटका करून घ्यायची असते. अल्ब्रेक्ट (अतुल पेठे) हा एका जुन्या नाट्यगृहाशी संबंधित असलेल्या कलाकारांच्या नाट्यमंडळाचा सदस्य असतो. त्याला नाट्यगृहाशी संबंधित कार्यक्रमांचे बजेट कापण्याचा विचार चालू असल्याचे समजते. संबंधित अहवाल ज्या कंपनीने बनविला आहे. त्या कंपनीला तो बिझनेस डील देतो. त्यातून कंपनीची प्रतिनिधी (पर्ण पेठे) त्याला भेटायला येतो. तिला नाटकात काडीचाही रस नसतो. एक हाडाचा रंगकर्मी कॉर्पोरेट जगातील आणि एआयच्या युगातील तरुणीला नाटक, थिएटर हा माणसाच्या सांस्कृतिक जीवनाचा श्वास आहे. हे कसे पटवून देतो, हे या नाटकात पाहायला मिळते. त्यातून कला, साहित्य, नाट्यगृहे, त्यांची गरज व बजेट. यावर आपणही विचार करायला लागतो. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर कोणत्या पक्षाच्या जाहीरनाम्यात नाटक, थिएटर, कलावंत व इतर कलांबाबत काही स्टेटमेंट आहे का? हा प्रश्न साहजिकच या निमित्ताने उपस्थित होतो.

टॅग्स :मराठीनाटक