Join us

गाडी घेता आहात, पण पार्किंग कुठे? वाहनमालकांना पार्किंग सुविधा दाखविणे होणार बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 14:56 IST

मुंबईमध्ये २०२४ मध्ये दोन लाख ६४ हजार ३२४ खासगी वाहनांची नोंदणी झाली असून, सध्या संपूर्ण मुंबईत ४८ लाखांहून अधिक वाहने आहेत

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यात दरवर्षी वाहन खरेदीत सहा ते सात टक्क्यांची वाढ अपेक्षित असून, २०३० पर्यंत वाहनांची संख्या सुमारे ६.८ कोटींपेक्षा जास्त असेल, असा अंदाज परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे येत्या काळात पार्किंगची समस्या बिकट होणार आहे. या प्रश्नावर उपाय शोधण्यासाठी पार्किंगचे नवीन धोरण आणण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईमध्ये २०२४ मध्ये दोन लाख ६४ हजार ३२४ खासगी वाहनांची नोंदणी झाली असून, सध्या संपूर्ण मुंबईत ४८ लाखांहून अधिक वाहने आहेत. राज्याचा विचार केला असता, हीच संख्या  ३.८ कोटी इतकी आहे. पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी नवीन रस्ते, उड्डाणपूल, भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहेत.

वाहतूक व्यवस्थापनासाठी हायब्रीड मॉडेल

  • शहरी भागांतील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी हायब्रीड मॉडेल राबविण्यात येईल. त्यानुसार मुंबईसारख्या शहरी भागातील व्यावसायिक केंद्रांमध्ये प्रवेश करण्यासाठी वाहनांना गर्दीचे शुल्क आकारण्यात येणार आहे, असे भीमनवार म्हणाले.  
  • वाहनांच्या संख्येवर अंकुश ठेवण्यासाठी नवीन वाहनांची विक्री आणि नोंदणी, यावर मर्यादा आणण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रस्ताव पाठविणार

वाढत्या वाहनांमुळे कितीही रस्ते बनविले तरी ते अपुरेच पडणार आहेत. त्यामुळे जपान आणि इतर देशांप्रमाणे वाहन खरेदी करताना नोंदणीकृत पार्किंग विकत घेणे अनिवार्य होणार असल्याचे संकेत भीमनवार यांनी दिले. यासाठी कॅबिनेटकडे प्रस्ताव पाठविण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

इतर पर्याय

  • जुन्या वाहन क्रमांकांचा (नंबर प्लेट) लिलाव 
  • शहरी भागातील पार्किंग शुल्क वाढ 
  • १५ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांचे स्वइच्छेने स्क्रॅपिंग
टॅग्स :पार्किंग