लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: तुम्ही घुसखोर आहात की नाही, हे सिद्ध करण्याची वेळ माझ्यावर आणू नका, अशा भाषेत म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी गोरेगाव येथील मोतीलालनगरमध्ये झालेल्या सभेत रहिवाशांशी नुकताच संवाद साधला आणि वादाला तोंड फुटले. तू जर का घुसखोर निघालास, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन, अशी दमदाटीही जयस्वाल यांनी एका तरुणाला केली. जयस्वाल यांनी मास्टर प्लॅनची माहिती सादर करताना संवाद साधला. मोतीलालनगर एक, दोन व तीन येथील वसाहतींचा म्हाडाकडून पुनर्विकास केला जाणार आहे. यासाठी म्हाडाकडून अदानी समूहाची निवड करण्यात आली आहे.
गोरेगाव (पश्चिम) येथील गणेश मैदान येथे मोतीलालनगर १, २ व ३ या वसाहतींच्या पुनर्विकासाचा समग्र बृहत् आराखडा स्थानिक रहिवाशांपुढे सादर करण्यात आला. याप्रसंगी जयस्वाल यांनी स्थानिक रहिवाशांशी संवाद साधताना पुनर्विकासाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला.
जयस्वाल यांचे भाषण सुरू असतानाच एका तरुणाने मागण्यांसंदर्भात पोस्टर उंचावून दाखवले व काही बोलू लागला. तेव्हा जयस्वाल यांनी संबंधिताला तुला मराठी येत नाही का? अशी विचारणा करून तरुणाला खाली बसण्यास सांगितले. त्या तरुणाला आणखी काही तरुणांनी साथ दिली. संबंधित तरुणाचे ओळखपत्र ताब्यात घेण्यास जयस्वाल यांनी पोलिसांना सांगितले. तुम्ही कुठून, कधी, केव्हा, कसे आलात, कोणत्या साली आलात, असे अनेक प्रश्न जयस्वाल यांनी यावेळी संबंधिताला विचारले.
तुमचा जन्मदेखील कधी झाला, याचीदेखील मी माहिती घेतो, असेही जयस्वाल म्हणाले. तू घुसखोर निघालास, तर इथूनच उचलून घेऊन जाईल, अशी धमकी दिल्यावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तुमची पुनर्विकास करण्याची इच्छा दिसत नाही. त्यामुळे माझा संवाद इथे संपवतो, असे सांगितले. मात्र, संवादाच्या या पद्धतीमुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.
जयस्वाल यांनी माफी मागावी
दरम्यान, संजीव जयस्वाल यांनी जसे काही आपण येथील जागेचे मालक आहोत, अशा भाषेत लोकांशी संवाद साधला आहे. या पद्धतीने संवाद साधणे योग्य नाही, असे नमूद करीत जयस्वाल यांनी माफी मागणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
Web Summary : MHADA Vice President Sanjeev Jaiswal threatened Goregaon residents, demanding they prove their residency. He warned one youth he'd be removed if deemed an encroacher, sparking outrage. Praveen Darekar criticized Jaiswal's tone, seeking apology.
Web Summary : म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल ने गोरेगांव के निवासियों को धमकी दी, कहा कि वे साबित करें कि वे घुसपैठिये नहीं हैं। उन्होंने एक युवक को चेतावनी दी कि अगर वह अतिक्रमणकारी पाया गया तो उसे हटा दिया जाएगा, जिससे आक्रोश फैल गया। प्रवीण दरेकर ने जयस्वाल के लहजे की आलोचना की और माफी की मांग की।