Join us

गुजरातमधील बंदरांमध्ये आलेले हजारो किलो ड्रग्सचा मुंबईतील समस्येशी संबंध आहे का? सचिन सावंतांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2023 3:52 PM

मुंबईतील झोपडपट्टी परिसरातील सुरू असलेला हा ड्रग्सचा फैलाव थांबवावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली आहे.

मुंबई : मुंबईतील झोपडपट्टी परिसरात ड्रग्सचा फैलाव वाढत चालला आहे. युवा पिढी ही देशाचे भविष्य आहे. ड्रग्सच्या फैलावाने देशाचे भविष्य उद्ध्वस्त होत तर आहेच, पण अनेक कुटुंबाच्या आशा आकांक्षा ही ध्वस्त होत आहेत. यामागे फार मोठे रॅकेट असून आता शाळेतील मुलेही लक्ष्य होत आहेत. मध्यमवर्गीय गृहनिर्माण संस्थामध्येही याचा प्रसार होत आहे. मुंबईतील झोपडपट्टी परिसरातील सुरू असलेला हा ड्रग्सचा फैलाव थांबवावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली आहे.

कांदिवली परिसरातील वेगवेगळ्या संस्थांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाला बरोबर घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमितीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह उत्तर मुंबई विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्तांची भेट घेतली. या भेटीमध्ये पोईसर परिसरात नागरी संस्थांनी घेतलेले सह्यांचे अभियान व जनमानसाचा प्रतिसाद अतिरिक्त पोलिस आयुक्त राजीव जैन यांच्यासमोर दर्शविण्यात आला. सदर प्रकार हा अतिशय गंभीर असून पोलिस यावर कडक कारवाई करतील आणि मूळापासून ड्रग्सचे रॅकेट खणून काढू असे आश्वासन अतिरिक्त पोलिस आयुक्तांनी दिले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना सचिन सावंत यांनी अनेक प्रश्नांवर प्रकाश टाकला. गुजरातमधील बंदरांमध्ये हजारो किलो ड्रग्स येत आहेत, पण त्याच्या मूळाशी तपास यंत्रणा पोहोचत नाहीत. या ड्रग्सचा मुंबईतील समस्येशी संबंध आहे का? याच्या चौकशीची गरज आहे असे ते म्हणाले. भाजपाचा दृष्टीकोन या समस्येकडे पाहताना केवळ राजकीय आहे, असेही सचिन सावंत म्हणाले. 

नार्कोटिक्स कंट्रोल विभाग केवळ ड्रग्स घेणाऱ्यांच्या मागे गेले काही महिने दिसला पण ड्रग्स पेडलर मात्र पकडले जात नाहीत याची खंत त्यांनी व्यक्त केली. लवकरच प्रत्येक झोपडपट्टीमध्ये नशामुक्ती केंद्र असावे या मागणीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे मागणी करु असे सावंत म्हणाले. दरम्यान, या शिष्टमंडळात माजी नगरसेवक राणा सिंह, मुंबई काँग्रेसचे सचिव आनंद राय,  आर. पी. पांडे, रत्नाकर सिंह, सुनिल तिवारी, राकेश झा व काही नागरी संस्थांचे पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

टॅग्स :सचिन सावंतराजकारणकाँग्रेसमुंबई