आंबेडकर स्मृती स्मारकाच्या व्यवस्थापनाची मनमानी
By Admin | Updated: March 15, 2015 00:20 IST2015-03-15T00:20:55+5:302015-03-15T00:20:55+5:30
शासनाने २० कोटी रु. खर्चून बांधलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मृती स्मारकाचा वापर करण्यास महाडकरांनाच मज्जाव होत आहे.

आंबेडकर स्मृती स्मारकाच्या व्यवस्थापनाची मनमानी
संदीप जाधव ल्ल महाड
चवदार तळे सत्याग्रहासह महाडमध्ये झालेल्या दलित चळवळीच्या इतिहासाच्या स्मृती सतत जागृत राहाव्यात यासाठी राज्य शासनाने २० कोटी रु. खर्चून बांधलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मृती स्मारकाचा वापर करण्यास महाडकरांनाच मज्जाव होत आहे. ही बाब अन्यायकारक असून डॉ. आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बार्टी) पुणे या संस्थेकडून या स्मारकाचा ताबा शासनाने त्वरित काढून घ्यावा या मागणीसाठी १८ मार्च २०१५ रोजी महाडच्या प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा दलितमित्र मधुकर गायकवाड यांनी शनिवारी दिला.
डॉ. आंबेडकर स्मृती स्मारकाचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या बार्टी या संस्थेचे महासंचालक परिहार जातीयवादी असल्याचा आरोपही गायकवाड यांनी यावेळी केला. डॉ. आंबेडकर स्मारकाच्या मनमानीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली एका सभेचे आयोजन करण्यात आलेले होते. हे स्मारक म्हणजे महाडचे एक सांस्कृतिक वैभव आहे. या स्मारकातील नाट्यगृह, तरणतलाव यांचा वापर करण्यास महाडकरांना व्यवस्थापनाकडून नकार दिला जात आहे. स्मारकातील नाट्यगृह येत्या दोन दिवसांत महाडकरांसाठी खुले करून न दिल्यास बार्टीच्या विरोधात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा गायकवाड यांनी यावेळी दिला.
राष्ट्रीय स्मारकाच्या देखभालीसाठी आलेल्या खर्चात एक कोटी रु. चा गैरव्यवहार झाल्याचा आरोप गायकवाड यांनी या बैठकीत केला.
सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांकडे या स्मारकाच्या व्यवस्थापनाच्या विरोधात अनेकवेळा तक्रारी करूनही या विभागाचे मंत्री त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केले. सुहासिनी नाट्यधारा संस्थेचे उमेश भिंडे यांनीही यावेळी बार्टीच्या अधिकाऱ्यांच्या मनमानीविरुध्द तीव्र नाराजी व्यक्त केली. या अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे आपल्या संस्थेला तीन वेळा कार्यक्रमाच्या तारखा बदलाव्या लागल्या, असे सांगून शेवटी नाट्यगृह उपलब्ध न झाल्यामुळे कार्यक्रम रद्द करावा लागल्याचे भिंडे यांनी सांगितले.