Join us

अटी पूर्ण करण्यासाठी एप्रिलची ‘डेडलाइन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 01:25 IST

अन्यथा पालिका उगारणार कारवाईचा बडगा

मुंबई : अनधिकृत ठरलेल्या मुंबईतील २११ शाळांना मान्यता मिळविण्यासाठी अटी पूर्ण करण्याकरिता महापालिकेने एप्रिलपर्यंतची मुदत दिली आहे. या कालावधीत संबंधित शाळांनी कार्यवाही पूर्ण करणे अपेक्षित आहे. अन्यथा अशा शाळांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यामुळे या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ४१ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे.मुंबईत शाळा सुरू करण्यापूर्वी महापालिकेकडे मान्यतेसाठी अर्ज करावा लागतो. मात्र अनेकवेळा अटी-शर्ती पूर्ण करण्याआधीच शाळा विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. मान्यता नसलेल्या या शाळांना बेकायदा ठरवून त्यांच्यावर पालिकेच्या शिक्षण विभागामार्फत कारवाई करण्यात येते. त्यानुसार शिक्षण विभागाने काही दिवसांपूर्वी २११ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली होती. या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, असे आवाहनही नागरिकांना करण्यात आले होते. परंतु यापैकी बहुतांशी शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले असल्याने या शाळांना मान्यतेसाठी अर्ज व प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी पालिकेने मुदत दिली आहे.शिवसेना नगरसेवक साईनाथ दुर्गे यांनी हरकतीचा मुद्दा मांडून या शाळांतील विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत काय धोरण ठरवले आहे, असा प्रश्न उपस्थित केला. या वेळी शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनीदेखील प्रशासनाला निर्देश देत संबंधित शाळांमधील विद्यार्थी शाळाबाह्य होऊ नयेत यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना केली.६२ शाळांकडून प्रतिसाद नाहीच...२११ शाळांना मान्यतेच्या अटी-शर्तींची पूर्तता करण्यासाठी महापालिकेने नोटीस पाठविली होती. यापैकी १४९ शाळांनी पालिकेला प्रतिसाद देत आवश्यक कागदपत्रे-अटींची पूर्तता केली. या शाळांचे प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठविल्यानंतर अनिवार्य अटी पूर्ण करणाऱ्या अवघ्या सात शाळांना ‘स्वयं अर्थसाहाय्य’ तत्त्वावर मान्यता देण्यात आली. मात्र २११ पैकी ६२ शाळांनी पालिकेच्या नोटीसला अद्याप प्रतिसाद दिलेला नाही.

टॅग्स :शाळा