Join us  

8 एप्रिलला नमाज घरातच करा, 14 एप्रिलच्या कार्यक्रमाचा फेरविचार करा- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2020 12:56 AM

शरद पवार यांचे राज्यातील सर्व समाजबांधवांना आवाहन

मुंबई : येत्या ८ एप्रिल रोजी मुस्लिम बांधवांचा कब्रस्तानमध्ये एकत्रित जावून हयात नसलेल्या नातेवाईकांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. मात्र हे स्मरण घरात बसूनच करा. नमाजही घरातच बसून करा. ही वेळ किंवा प्रसंग एकत्रित बाहेर जाण्याचा नाही. तसेच १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण श्रद्धेने करण्याचा दिवस आहे. संबंधित सोहळ्यात बदल करण्याचा विचार जाणकारांंनी करावा, असे आवाहन राष्टÑवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले.

देशभरातून लोक एकत्र येत असतात आणि बाबासाहेबांचे स्मरण करण्याचा हा सोहळा दीड महिना चालतो. यावेळेला हा सोहळा पुढे नेणे शक्य आहे का? याचा यंदा गांभीर्याने विचार करावा, असे ते म्हणाले.

मी कालपासून गीत रामायण ऐकतोय. गदीमा आणि सुधीर फडके यांचे संगीत ऐकल्यावर मनापासून समाधान मिळत आहे. नव्या पिढीने वाचन संस्कृती जतन व वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवा. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनदर्शन, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परिवर्तन लिखाण आदी लिखाण वाचा, असे ते म्हणाले.

३ लाख लोकांना निवारा

राज्य सरकार, स्वयंसेवी संस्थांमार्फत राज्यात एकूण ३ हजार १४३ कॅम्पमध्ये ३ लाख ३२ हजार २६६ लोकांना निवारा, अन्नधान्य व औषध सुविधा देण्यात आली आहे, असे पवार यांनी सोशल मीडियामार्फत साधलेल्या संवादात सांगितले.

टॅग्स :शरद पवारमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस