मुंब्र्यातील ‘त्या’ मस्जिद ट्रस्टची जागा वाढीव दराने भाडेतत्त्वावर देण्यास मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:07 IST2021-06-16T04:07:29+5:302021-06-16T04:07:29+5:30

अल्पसंख्याक विकासमंत्र्यांची माहिती लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वक्फ मंडळाअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या मुंब्रा (जि. ठाणे) येथील कौसा जामा मस्जिद ...

Approval to lease space of 'Tya' Masjid Trust in Mumbra at increased rate | मुंब्र्यातील ‘त्या’ मस्जिद ट्रस्टची जागा वाढीव दराने भाडेतत्त्वावर देण्यास मान्यता

मुंब्र्यातील ‘त्या’ मस्जिद ट्रस्टची जागा वाढीव दराने भाडेतत्त्वावर देण्यास मान्यता

अल्पसंख्याक विकासमंत्र्यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वक्फ मंडळाअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या मुंब्रा (जि. ठाणे) येथील कौसा जामा मस्जिद ट्रस्ट यांच्याकडील जागा वाढीव दराने भाडेतत्त्वावर देण्यास शासनामार्फत मंगळवारी मान्यता देण्यात आली. त्यामुळे ट्रस्टच्या उत्पन्नात भरीव वाढ होणार असून, त्याचा अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी लाभ होईल, असे अल्पसंख्याक विकास आणि औकाफ विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी मंगळवारी सांगितले.

मलिक म्हणाले की, कौसा जामा मस्जिद ट्रस्टची मुंब्रा येथे २२१ गुंठे इतकी जागा असून, भाडेतत्त्वावर देण्यासाठी ट्रस्टने निविदा प्रक्रिया राबविली होती. वक्फ नियमानुसार जागेच्या रेडी रेकनर दराच्या किमान एक टक्का इतक्या रकमेइतके वार्षिक भाडे मिळायला हवे. ही रक्कम १४ लाख इतकी होती; परंतु, ही जागा भाडेतत्त्वावर देण्याच्या निविदा प्रक्रियेमध्ये खडावली एज्युकेशन सोसायटी यांनी सर्वाधिक दर सादर केला. त्यामुळे त्यांच्या निविदेस मान्यता मिळाली. या व्यवहारास वक्फ मंडळाने मान्यता दिली. मंगळवारी यास शासनामार्फतही मान्यता देण्यात आली. यानुसार या भाडेकराराच्या माध्यमातून ट्रस्टला वार्षिक २९ लाख ११ हजार १११ रुपये भाडे मिळेल. वक्फ नियमानुसार निर्धारित किमतीच्या जवळपास दुप्पट इतकी ही रक्कम असून यामुळे ट्रस्टच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल.

राज्यातील वक्फ मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेल्या इतर संस्था, ट्रस्ट यांनीही याच पद्धतीने पुढे येऊन आपल्या संस्थेच्या उत्पन्नात भरीव वाढ होईल यासाठी प्रयत्न करावेत. वाढीव उत्पन्नाचा उपयोग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक उन्नतीसाठी करावा. शासनाकडे येणाऱ्या अशा सर्व प्रस्तावांना मान्यता देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

...........................................................

Web Title: Approval to lease space of 'Tya' Masjid Trust in Mumbra at increased rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.