Join us
Daily Top 2Weekly Top 5

विधि शाखेच्या प्रवेशाच्या अतिरिक्त फेरीला मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 05:22 IST

विधि शाखेच्या प्रवेशाच्या अतिरिक्त फेरी २३ ते २९ एप्रिलपर्यंत

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील विधि शाखेच्या ३ वर्षीय अभ्यासक्रमांच्या सीईटीमार्फत राबविण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेनंतर रिक्त राहिलेल्या ७६७ जागांसाठी २३ एप्रिल ते २९ एप्रिल २०२१ दरम्यान अतिरिक्त प्रवेश फेरी राबविण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करून दिली. यासंदर्भातील अधिक माहितीसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे संकेतस्थळ पाहावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहून त्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अतिरिक्त फेरी राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा राज्यात विधि शाखेच्या ३ वर्षीय अभ्यासक्रमांच्या १७ हजार २२२ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी १६ हजार २४९ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. अद्याप ७६७ जागा रिक्त आहेत. अतिरिक्त फेरीसाठी रिक्त जागा असलेल्या विद्यापीठांमध्ये राज्यातील मुंबईतील २ विद्यापीठे, सोलापूर, नागपूर, मराठवाडा, अमरावती, औरंगाबाद, गडचिरोली, जळगाव, पुणे येथील संलग्नित महाविद्यालयांचा समावेश आहे.

सर्वांत जास्त रिक्त जागा या मुंबई विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात असून येथील रिक्त जागांची संख्या ४५२ आहे, तर त्यानंतर पुणे विद्यापीठात १२१, नागपूर आणि जळगाव विद्यापीठात अनुक्रमे ६७ आणि ५३ जागा रिक्त आहेत.

रिक्त जागांचा तपशीलमराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद ५, गडचिरोली विद्यापीठ, गडचिरोली १६, बहिणाबाई चौधरी महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव ५३, मुंबई विद्यापीठ, मुंबई ४५२, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर ०, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर ६७, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ १०, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ १२१, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर १२, एसएनडीटी महिला विद्यापीठ मुंबई २३, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड ८, एकूण - ७६७.