म्हाडा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीला ‘मुहूर्त’ नाही
By Admin | Updated: November 30, 2015 02:35 IST2015-11-30T02:35:31+5:302015-11-30T02:35:31+5:30
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) अध्यक्षपद गत १० वर्षांपासून रिक्त आहे. त्याचप्रमाणे म्हाडाच्या ९ मंडळांच्या सभापती पदांच्या

म्हाडा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीला ‘मुहूर्त’ नाही
मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) अध्यक्षपद गत १० वर्षांपासून रिक्त आहे. त्याचप्रमाणे म्हाडाच्या ९ मंडळांच्या सभापती पदांच्या नियुक्त्या रखडल्याने अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. अधिकारी आठवड्यातून तीन दिवसच नागरिकांना भेटत असल्याने आपली गाऱ्हानी मांडायची कुणाकडे, असा संतप्त सवाल नागरिकांतून व्यक्त होत आहे.
काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात म्हाडाच्या अध्यक्ष पदासह ९ मंडळांच्या सभापतींची नेमणूक कित्येक वर्षे झालेली नाही. राज्यमंत्र्याचा दर्जा असलेल्या या पदाचे कार्यकर्त्यांना केवळ आमिष दाखवून त्यांना झुलवित ठेवण्यात येत होते, वर्षभरापूर्वी सत्तेवर आलेल्या भाजपा-सेनेच्या युतीनेही हाच कित्ता गिरविला असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. अन्य महामंडळांतील पदाबरोबरच म्हाडातील विविध मंडळांचे सभापती पदाच्या वाटपाचा गुंता अद्याप सुटलेला नाही. भाजपाचे अधिक आमदार निवडून आल्याने राज्यातील महत्त्वाची महामंडळे आपल्या ताब्यात ठेवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. राज्यभरात विस्तारलेल्या आणि मुंबईतील झोपडपट्टी ते जुन्या इमारतींशी संबंधित असलेले म्हाडाचे अध्यक्षपद आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजपा प्रयत्न करत आहे. या पदावर वर्णी लावण्यासाठी भाजपा नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
सेना-भाजपाच्या कार्यकाळात म्हाडाचे अध्यक्षपद भाजपा नेते मधू चव्हाण यांच्याकडे होते. त्यानंतर काँग्रेस सत्तेत आल्यानंतर २00५पर्यंत काँग्रेस नेते मधू चव्हाण यांच्याकडे हे पद देण्यात आले. विलासराव देशमुख ते त्यानंतरच्या मुख्यमंत्र्यांनी गृहनिर्माण विभागाचा कार्यभार आपल्या हाती ठेवल्याने म्हाडाचे अध्यक्षपद रिक्त आहे. २00४ साली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता जाहीर होण्याच्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसने प्राधिकरणाच्या चार सदस्यांची नियुक्ती केली. मात्र, अध्यक्षपद रिक्तच ठेवले होते.
मंडळांचे सभापती पद आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी अनेक नेत्यांमध्ये रस्सीखेच असते. म्हाडा प्राधिकरणाचे ९ सदस्य असतात. त्यामध्ये अध्यक्ष आणि इतर पाच सदस्य अशासकीय असतात. प्राधिकरणामध्ये म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे उपाध्यक्ष, गृहनिर्माण विभागाचे सचिव आणि नगरविकास विभागाचे प्रधान सचिव हे पदसिद्ध सदस्य असतात.
अध्यक्ष हे म्हाडाच्या सर्व मंडळांवर आपले वर्चस्व ठेवत असतात. त्यामुळे या पदाला महत्त्व असते. या पदावर आपली वर्णी लागावी यासाठी नेत्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता आणि गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर म्हाडा कारभारावर लक्ष ठेवून आहेत. त्यांच्यामध्ये समन्वय नसल्याने म्हाडा अधिकाऱ्यांवर कोणाचाच वचक नाही.
आपल्या विविध समस्या, प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी नागरिक अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी दूरवरून म्हाडाच्या प्रधान कार्यालयात येरझाऱ्या घालत असतात. मात्र अपवाद वगळता बहुतांशवेळा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्याची दखलही घेतली जात नाही. एकतर ते त्यांच्या जागेवर नसतात; आणि नागरिकांच्या सुदैवाने ते असले तरी त्यांच्या कक्षाबाहेर किमान तास, दीड तास ताटकळत बसल्यानंतरच त्यांना आत प्रवेश मिळतो. त्यानंतर पूर्ण समस्या ऐकून न घेता केवळ एक-दोन मिनिटांतच त्यांची बोळवण केली जाते. म्हाडाने नागरिकांना भेटण्यासाठी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे आठवड्यातून तीन दिवस दिले आहेत.