क्षयरुग्णांसाठी २८ समुपदेशकांची नियुक्ती करणार
By Admin | Updated: December 28, 2014 00:45 IST2014-12-28T00:45:24+5:302014-12-28T00:45:24+5:30
मुंबईसारख्या शहरात लोकसंख्येची घनता दाट असल्यामुळे क्षयरोग पसरण्याचा धोका जास्त आहे. क्षयरोगावरचे उपचार हे दीर्घकालीन आहेत.

क्षयरुग्णांसाठी २८ समुपदेशकांची नियुक्ती करणार
मुंबई : मुंबईसारख्या शहरात लोकसंख्येची घनता दाट असल्यामुळे क्षयरोग पसरण्याचा धोका जास्त आहे. क्षयरोगावरचे उपचार हे दीर्घकालीन आहेत. या औषधोपचारांना कंटाळून काही रुग्ण मध्येच उपचार सोडून देत असल्यामुळे इतरांना क्षयरोगाची लागण होण्याचा धोका वाढतो. क्षयरोग रुग्णांचे समुपदेशन करण्यासाठी सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत २८ समुपदेशकांची नेमणूक करण्यात येणार आहे, असे मुंबई क्षयरोग अधिकारी डॉ. मिनी खेत्रपाल यांनी सांगितले. रुग्णांची काळजी घेत असताना काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष केले जात असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
क्षयरोग झालेल्या रुग्णाला पहिले दोन महिने केंद्रावर जाऊन औषधे घ्यावी लागतात. दोन महिन्यांनी एक दिवस केंद्रावर येऊन औषध घ्यावे लागते आणि त्यांना इतर औषधे घरी दिली जातात. या रुग्णांचा फॉलोअप कार्यक्रमांतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकरवी घेतला जातो. काही रुग्ण कंटाळून औषधे घेणे सोडतात. औषधे घेणे मध्येच सोडल्याने रुग्णांचा आजार बळावतो, हा धोका रुग्णांच्या लक्षात येत नाही.
क्षयरोग रोखण्यासाठी कार्यक्रमातर्फे उपाययोजना राबवत असताना मात्र कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. या कार्यक्रमांतर्गत फक्त ४०० कर्मचारी कार्यरत आहेत. याच कर्मचाऱ्यांना कामे विभागून दिली आहेत. यातील काही कर्मचारी हे वस्त्यावस्त्यांमध्ये फिरून रुग्णांचा शोध घेत असतात, तर काही जण रुग्णांचा फॉलोअप घेत असतात. मात्र, कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
क्षयरोग हा संसर्गजन्य असून रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्याने होतो. यामुळे या कर्मचाऱ्यांना जेवण भत्ता दिला पाहिजे. प्रत्यक्षात मात्र हा भत्ता मिळत नाही, मुंबईच्या लोकसंख्येच्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, ३५० कर्मचारी हे कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत, एमडीआरचे रुग्ण पाहताना मास्क सेफ्टीसाठी मास्क नसतो, वेळेवर पगार मिळत नाही, प्रवास भत्ता मिळत नाही, एखादा कर्मचारी आजारी पडल्यास त्याला कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाहीत, यामुळे कर्मचारी नाराज आहेत. पण त्यांना अनेक वर्षे लढा देऊनही न्याय मिळालेला नाही.
कार्यक्रमांतर्गत नमूद असलेल्या नियमांप्रमाणे सर्व नियमांचे पालन केले जात आहे. कर्मचाऱ्यांना सुविधा दिल्या जात आहेत, असे कार्यक्रमाच्या मुंबई क्षयरोग अधिकारी डॉ. खेत्रपाल यांनी सांगितले.
रुग्णांनी औषधे घेणे किती गरजेचे आहे, औषधे घेतल्याने ते बरे होऊ शकतात याविषयी त्यांचे समुपदेशन करण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स येथून १८ समुुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढच्या काही दिवसांत अजून २८ समुपदेशकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे डॉ. खेत्रपाल यांनी सांगितले.