अपना टाइम आएगा... धारावी रॅपर्सची रंजक कथा! संगीतातून ओळख निर्माण करणारी एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती
By मनोज गडनीस | Updated: September 29, 2025 13:24 IST2025-09-29T13:24:28+5:302025-09-29T13:24:56+5:30
धारावी ही रॅप संगीतातून ओळख निर्माण करणारी एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आहे. स्थानिक समस्यांना शब्दांतून मांडणाऱ्या कलाकारांनी धारावीला जागतिक स्तरावर रॅपची राजधानी बनवली आहे.

अपना टाइम आएगा... धारावी रॅपर्सची रंजक कथा! संगीतातून ओळख निर्माण करणारी एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती
मनोज गडनीस
विशेष प्रतिनिधी
प्रत्येक लोकसंस्कृतीचे आपापले असे एक वैशिष्ट्य असते. त्यामध्ये त्या संस्कृतीचा विशिष्ट असा पेहराव असतो, त्यांचे खाद्यपदार्थ असतात. बोलीभाषा असते. शतकानुशतके चालत आलेल्या परंपरा असतात आणि या सर्वांच्या पगड्यातून त्यांचे साहित्य, कविता, गीते आणि लोकसंगीत तयार झालेले असते. दीड-दोनशे वर्षांपूर्वी मुंबईच्या मध्यभागी वसलेल्या धारावीचे देखील एक असे स्वतःचे वैशिष्ट्य आहे. धारावी म्हणजे केवळ विविध उद्योगांची वस्ती नव्हे किंवा श्रमिकांच्या निवाऱ्याची जागा नव्हे, तर धारावी म्हणजे रॅप संगीताची देखील एक वैशिष्ट्यपूर्ण म्युझिक इंडस्ट्री आहे. ही इंडस्ट्री इतकी लोकप्रिय आहे की, अभिनेता रणवीर सिंग यांचा गली बॉय हा सिनेमा चांगलाच गाजला होता. तर, धारावी लाइव्हमध्ये आज धारावीच्या अंतरंगात दडलेल्या या कलाकारांचा शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे.
धारावीमध्ये दाक्षिणात्य समाजाचे प्राबल्य आहे. त्यामुळे तेथील संगीताचा तेथील वस्त्यांमध्ये प्रभाव आहे. १९९० च्या दशकात जागतिकीकरणानंतर अनेक पाश्चिमात्य घटकांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली. त्यातून मग रॅप संगीताची देखील माहिती तळागाळातील भारतीय समाजाला झाली. भारतीय संगीत आणि पाश्चात्य संगीत याचा मिलाफ मात्र त्यामध्ये शब्दांना महत्त्व देत रॅप संगीताचे गारूड तरुण मनाला भावत गेले. आपल्या समस्या, आपला भोवताल यातून आपले जळजळीत वास्तव आणि त्यातून आपल्या मनात त्याबद्दल असलेला असंतोष या गाण्यांद्वारे मांडला जाऊ लागला.
धारावीमध्ये १९९० च्या दशकात असे सुरुवातीलाल तीन ग्रुप तयार झाले, ज्यांनी आपल्या गरिबी आणि अन्य समस्येला वाचा फोडण्यासाठी रॅप संगीताचा आधार घेतला. आजच्या घडीला तेथे असे ५० ग्रुप आहे. हिप हॉप, रॅप, रॉक असे पाश्चात्य संगीताचे कित्येक प्रकार ते सादर करतात. हे सादरीकरण अत्यंत व्यावसायिकरित्या केले जाते. हे कलाकार पूर्ण वेळ हेच करतात असे नव्हे. या पथकातील बरेच कलाकार परिस्थितीमुळे अर्थार्जनासाठी नोकरी देखील करतात. विमानतळावर हेल्परचे काम करणारा शंकर महिन्याकाठी दहा हजार रुपये मिळवतो. पण, कामाच्या ठिकाणी जाताना त्याच्या बॅगेत कायमच वही व पेन असते. कधी काय सुचेल हे माहिती नसते.
पण, सुचले की पहिले ते लिहायचे. त्यांच्या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची गायकी ही शब्दप्रधान आहे. भोवतालच्या वास्तवावर सणसणीत कोरडे ओढणे आणि यातूनच एक दिवस क्रांती होईल, अशी त्यांची ठाम धारणा आहे. केवळ पटापट गाणे म्हणजे रॅप नव्हे, तर त्याच्या प्रभावी सादरीकरणासाठी आकर्षक आणि लक्षवेधी लकबशीर नृत्य करणे हा देखील प्रभावी सादरीकरणाचा मार्ग त्यांनी निवडला आहे. त्यामुळेच आजच्या घडीला धारावी रॅपर्सच्या विविध ग्रुपना सोशल मीडियावर लाखो फॉलाेअर्स आहेत. तसेच, देशात आणि परदेशात देखील अनेक ठिकाणी त्यांना आवर्जून सादरीकरणासाठी निमंत्रित करण्यात येते.