चिंता कायम! राज्यात दिवसभरात ३५,७३६ कोरोना रुग्ण; १६६ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:07 IST2021-03-28T04:07:05+5:302021-03-28T04:07:05+5:30
दैनंदिन मृत्यूचा उच्चांक, मुंबईत नव्या ६ हजार १२३ बाधितांचे निदान लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात दिवसभरात ३५ हजार ...

चिंता कायम! राज्यात दिवसभरात ३५,७३६ कोरोना रुग्ण; १६६ मृत्यू
दैनंदिन मृत्यूचा उच्चांक, मुंबईत नव्या ६ हजार १२३ बाधितांचे निदान
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात दिवसभरात ३५ हजार ७३६ कोरोना रुग्णांचे निदान झाले असून १६६ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २६ लाख ७३ हजार ४६१ झाली असून, बळींचा आकडा ५४ हजार ७३ झाला आहे. तर, ३ लाख ३ हजार ४७५ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आऱोग्य विभागाने दिली. राज्यात पहिल्यांदाच सर्वाधिक १६६ दैनंदिन मृत्यूंची नोंद झाली. यापूर्वी, २३ मार्च रोजी १३१ मृत्यूंची नोंद झाली होती. मागील कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळापासून पहिल्यांदाच दैनंदिन मृत्यूंच्या उच्चांकाची नोंद झाली आहे. मुंबईत दिवसभरात नव्या ६ हजार १२३ बाधितांचे निदान झाले असून १२ जणांना जीव गमवावा लागला.
राज्यात शनिवारी १४ हजार ५२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत २३ लाख १४ हजार ५७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.५८ टक्के झाले असून मृत्यूचे प्रमाण २.२ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ९१ लाख ७५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.९३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४ लाख ८८ हजार ७०१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १५ हजार ६४४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
दिवसभरात नोंद झालेल्या १६६ मृत्यूंमध्ये मुंबई १२, नवी मुंबई मनपा ४, कल्याण-डोंबिवली मनपा ५, उल्हासनगर मनपा १, मीरा-भाईंदर मनपा २, वसई-विरार मनपा १, रायगड ३, पनवेल मनपा ५, नाशिक १, नाशिक मनपा ९, जळगाव ३, जळगाव मनपा १, नंदूरबार १५, पुणे २, पुणे मनपा ८, पिंपरी-चिंचवड मनपा ४, सोलापूर ४, सोलापूर मनपा १, कोल्हापूर १, सांगली-मिरज-कुपवडा मनपा १, रत्नागिरी १, औरंगाबाद २, औरंगाबाद मनपा ३, परभणी १, परभणी मनपा ६, लातूर १, लातूर मनपा २, उस्मानाबाद ३, बीड ३, नांदेड २, अकोला ३, अकोला मनपा १७, अमरावती ५, अमरावती मनपा १, बुलडाणा ३, वाशिम १, नागपूर २, नागपूर मनपा १८, वर्धा ५, गोंदिया १, चंद्रपूर १, गडचिरोली २ इ. रुग्णांचा समावेश आहे.
मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्येचा नवा उच्चांक
मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. सलग तीन दिवस ५ हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाल्यानंतर शनिवारी शहरात ६ हजार १२३ रुग्णांची नोंद झाली, तर बळींचा आकडा १२ आहे. मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ९१ हजार ७५१ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ११ हजार ६४१ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात मृत्यू झालेल्या १२ रुग्णांपैकी ९ जणांना काही दीर्घकालीन आजार होते. ७ रुग्ण पुरुष आणि ५ महिलांचा यामध्ये समावेश होता. ८ रुग्णांचे वय ६० वर्षावर होते. गेल्या २४ तासांत २ हजार २९४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ३ लाख ३७ हजार ५५५ रुग्ण कोरोनामुक्त झालेत. दिवसभरात ४८ हजार ७५ जणांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. आतापर्यंत मुंबईत एकूण ३९ लाख ३६ हजार ९३० कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६ टक्के आहे. २० मार्च ते २६ मार्चपर्यंत एकूण कोरोना वाढीचा दर १.०६ टक्के इतका आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ६३ दिवस आहे. मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, सध्या ५३ सक्रिय झोन असून ५५१ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.
.................