Join us
Daily Top 2Weekly Top 5

परमबीर सिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या अनुप डांगेंची गावदेवी ठाण्यात नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 07:50 IST

पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांची पुन्हा गावदेवी पोलीस ठाण्यात नियुक्ती केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

मुंबई :

सिल्वर ओक हल्ला प्रकरणामुळे पोलीस दलावर टीका होत असताना, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांची पुन्हा गावदेवी पोलीस ठाण्यात नियुक्ती केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

त्याचवेळी हल्ल्याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामप्यारे राजभर यांची उचलबांगडी करत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गृह विभागाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली.

दक्षिण मुंबईतील गावदेवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डर्टी बन्स पब रात्री उशिरापर्यंत सुरू असल्यामुळे तो बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण झाली होती. परमबीर सिंह यांनी आरोपीच्या यादीतून एकाचे नाव काढण्यास सांगितल्याचा आरोप करत डांगे यांनी पोलीस महासंचालक, गृह विभाग आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. त्याच डांगे यांची आता गावदेवी पोलीस ठाण्यात नियुक्ती केली आहे.