बलात्कारातील आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर
By Admin | Updated: March 24, 2015 00:43 IST2015-03-24T00:43:50+5:302015-03-24T00:43:50+5:30
धारावी येथे धावत्या कारमध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या चार आरोपींपैकी एका आरोपी उर्दू पत्रकाराला उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.

बलात्कारातील आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर
मुंबई : धारावी येथे धावत्या कारमध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या चार आरोपींपैकी एका आरोपी उर्दू पत्रकाराला उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.
न्या. रेवती मोहिते डेरे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. वांद्रे लिंकिंग रोड येथे जाऊ इच्छिणाऱ्या ३४ वर्षीय विधवा महिलेला रिक्षाचालकाने चुकीने धारावी टी जंक्शन येथे सोडले होते. त्यानंतर इनोव्हा कारने तेथे आलेला तिच्या ओळखीचा लाला पठाण आणि पत्रकार अन्सारी यांनी अन्य दोघा जणांच्या मदतीने बलात्कार केल्याचा आरोप होता. मात्र अन्सारी हा तक्रारदार महिलेला ओळखत नव्हता आणि गुन्हा घडला तेव्हा तो त्याची पत्नी आणि मुलीसह वांद्रे (पूर्व) येथील भारत नगरमधील ज्वेलरीच्या दुकानात होता, असे त्याचे वकील अॅड. महेश वासवानी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.
पोलीस उपायुक्त महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील चौकशीत मोबाइल रेकॉर्डनुसार गुन्हा घडला तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित नसल्याचे स्पष्ट होत असल्याचेही अॅड. महेश वासवानी यांनी युक्तिवाद करताना नमूद केले. त्यांच्यासोबत अॅड. धारिणी नागदा, अॅड. अनुश्री कुलकर्णी, अॅड. शमा मुल्ला आणि अॅड. लता शानभाग यांनी हा गुन्हा खोटा असून आपल्या अशिलाला त्यात पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने गोवल्याचे न्यायालयासमोर मांडले. त्या युक्तिवादानंतर न्या. रेवती मोहिते डेरे यांनी अन्सारीला अटकपूर्व जामीन मंजूर करून अटकेच्या वेळी त्याला १५ हजार रुपयांच्या हमीवर सोडण्याचा आदेश दिला. अॅड. श्रीमती पी.पी. शिंदे यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले. (प्रतिनिधी)