वाढत्या तणावाचा आणखी एक बळी
By Admin | Updated: May 19, 2015 00:29 IST2015-05-19T00:29:03+5:302015-05-19T00:29:03+5:30
वाढत्या तणावाने रविवारी रात्री आणखी एका पोलिसाचा बळी घेतला. गोरेगाव वाहतूक विभागाचे प्रभारी पोलीस निरीक्षक भारत कुंभारे यांचे राहत्या घरी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

वाढत्या तणावाचा आणखी एक बळी
मुंबई : वाढत्या तणावाने रविवारी रात्री आणखी एका पोलिसाचा बळी घेतला. गोरेगाव वाहतूक विभागाचे प्रभारी पोलीस निरीक्षक भारत कुंभारे यांचे राहत्या घरी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
कुंभारे मूळचे पुण्याचे. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुले असा परिवार आहे. त्यांचा मुलगा शिक्षणासाठी कॅनडात असून तो मुंबईला येण्यासाठी निघाल्याची माहिती सहकाऱ्यांनी दिली. पुढल्या वर्षी कुंभारे निवृत्त होणार होते.
कुंभारे दहिसरच्या साई आॅर्किड इमारतीमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होते. रविवारी रात्री कुंभारे यांना थोडे अस्वस्थ वाटत होते. त्यानंतर अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे घरच्यांनी त्यांना बोरीवलीच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार मिळण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.
कुंभारे १९८८ साली पोलीस दलात दाखल झाले. अत्यंत मनमिळावू पोलीस अधिकारी अशी त्यांची ओळख होती. वाहतूक शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सहकाऱ्यांनी सहकारी कुंभारेंच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी रीघ लावली होती. त्यांच्या पार्थिवावर उद्या साताऱ्यात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, अशी माहिती नातेवाइकांनी लोकमतला दिली. (प्रतिनिधी)
लग्नाचा आनंद
शोककळेत बदलला !
कुंभारे यांच्या धाकट्या मुलीचे लग्न ठरले होते. विवाह सोहळा ७ जूनला निश्चित झाला होता. त्यामुळे घरात लग्नाच्या तयारीची धावपळ सुरू होती. आनंदाचे वातावरण होते. मात्र कुंभारे यांच्या अकस्मात निधनाने आनंदी वातावरण शोककळेत बदलले.