पालघरात आणखी एक स्वाइनचा रुग्ण
By Admin | Updated: February 8, 2015 23:03 IST2015-02-08T23:03:56+5:302015-02-08T23:03:56+5:30
पालघरच्या मेटिल्डा अल्मेडा या ६१ वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने नुकताच मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या ३० वर्षीय मुलगा नायजेल यालाही

पालघरात आणखी एक स्वाइनचा रुग्ण
पालघर : पालघरच्या मेटिल्डा अल्मेडा या ६१ वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने नुकताच मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या ३० वर्षीय मुलगा नायजेल यालाही काल स्वाईन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले. त्याला पुढील उपचारासाठी मुंबईच्या कस्तुरबा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पालघरमधील फिलीआ रूग्णालया समोरील विघ्नेश्वर सोसायटी मध्ये राहणाऱ्या मेटिल्डा अल्मेडा या महिलेचा ३ फेब्रुवारी रोजी स्वाईन फ्लूच्या आजाराने मृत्यू झल्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागे होऊन त्यांनी या इमारतीमधील रहिवाशी व मृतरूग्णांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींची तपासणी मोहिम हाती घेतली होती. पालघरमधील स्वाईन फ्लूचा हा दुसरा रूग्ण सापडल्याने पालघर शहरात भीतीचे वातावरण आहे. या परिसरातील नागरीकांना प्रतिबंधात्मक उपचार म्हणून १०० लोकांना जिल्हा आरोग्य विभागाकडून व्हॅक्सीनचे वाटप करण्यात येणार असल्याचे नगरसेवक मकरंद पाटील यांनी सांगितले. पालघर नगरपरिषद व आरोग्य विभागाकडून स्वाईन फ्लूचा अधिक प्रसार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्या जात असल्या तरी राज्यात स्वाईन फ्लूमुळे रूग्णांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण नागरीकांमध्ये अधिकच चिंता पसरवित आहे. पालघरमधील एकूण ६१० लोकांचे सर्वेक्षण करण्यात आल्यानंतर त्यामधून १५ संशयीत रूग्ण आढळले होते. त्या सर्वांवर जिल्हा आरोग्य विभागाकडून उपचार करून टॅमीफील औषध देण्यात आले होते.
(वार्ताहर)