Join us  

परीक्षा विभागाचा आणखी एक घोळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 2:02 AM

विद्यापीठाचा परीक्षा विभाग शुक्रवारी पुन्हा एकदा चर्चेत आला. या वेळी चर्चेत येण्याचे कारण ठरले ते म्हणजे सिव्हिल इंजिनीअरिंगचा मागच्याच वर्षीचा पेपर..!

ठळक मुद्देमुंबई विद्यापीठ पुन्हा चर्चेत; जुनाच पेपर पुन्हा विद्यार्थ्यांच्या हाती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : विद्यापीठाचा परीक्षा विभाग शुक्रवारी पुन्हा एकदा चर्चेत आला. या वेळी चर्चेत येण्याचे कारण ठरले ते म्हणजे सिव्हिल इंजिनीअरिंगचा मागच्याच वर्षीचा पेपर..! पेपर सेट करण्यासाठी विद्यापीठाच्या कायदा व नियमांतर्गत वेगळी समिती असूनही मागच्या वर्षीचा पेपर यंदाच्या सिव्हिलच्या विद्यार्थ्यांना दिला गेला. यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे.

सिव्हिल इंजिनीअरिंगच्या पेपरसाठी महाविद्यालयांत विद्यापीठाकडून प्रश्नपत्रिका पोहोचवल्या जातात. मात्र यंदा २२ मे रोजी सिव्हिल इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या सेमिस्टरच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना जो पेपर मिळाला तो हुबेहूब ७ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या पेपरसारखाच असल्याचे आढळून आले. ही प्रश्नपत्रिका जवळपास ८५ टक्के सारखी असल्याचा दावा सिनेट सदस्य वैभव नरवडे यांनी केला आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या या घोळामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

विद्यापीठाच्या कायद्यानुसार कलम ३२(५) अंतर्गत परीक्षांचा पेपर सेट करण्यासाठी वेगळी समिती नेमण्यात आली असून यात ३ सदस्य असतात. या तिन्ही सदस्यांमार्फत ३ वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका बनविल्या जातात आणि त्यापैकी एक प्रश्नपत्रिका महाविद्यालयांना पाठविली जाते. विद्यापीठाच्या या घोळामुळे या समितीने एक तर नवीन प्रश्नपत्रिका बनविलीच नाही किंवा कर्मचारी, अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप सिनेट सदस्य वैभव नरवडे यांनी केला.

यासंदर्भात विद्यापीठाचे रजिस्टार दिनेश कांबळे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

 

विद्यापीठाने आता तरी आपल्या कार्यप्रणालीत बदल करून चुका सुधारायला हव्यात. विद्यापीठ व परीक्षा विभागाच्या नाकर्तेपणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. नवीन कुलगुरूंनी यामध्ये लक्ष द्यावे.

- वैभव नरवडे, सिनेट सदस्य

 

गेल्या वर्षीच्या आणि यंदाच्या प्रश्नपत्रिकेत पूर्णपणे साम्य नाही. काही साम्य आढळून आले असून या प्रकरणी आम्ही पेपर सेटरकडून स्पष्टीकरण मागविले आहे. त्यांच्या स्पष्टीकरणानंतर यासंदर्भातील पुढील कार्यवाही केली जाईल. विद्यार्थ्यांनी चिंता करू नये.

- विनोद मळाळे, जनसंपर्क अधिकारी, मुंबई विद्यापीठ

टॅग्स :मुंबई विद्यापीठपरीक्षाविद्यार्थी