‘लोन पे’ ॲपमुळे आणखी एकाने संपविले आयुष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:12 IST2021-01-13T04:12:48+5:302021-01-13T04:12:48+5:30

भावाची तक्रार : चारकाेप पाेलिसांत गुन्हा दाखल लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मोबाइल ॲपद्वारे इन्स्टंट लोन दिल्यानंतर ग्राहकाचा छळ ...

Another person lost his life due to 'Loan Pay' app | ‘लोन पे’ ॲपमुळे आणखी एकाने संपविले आयुष्य

‘लोन पे’ ॲपमुळे आणखी एकाने संपविले आयुष्य

भावाची तक्रार : चारकाेप पाेलिसांत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मोबाइल ॲपद्वारे इन्स्टंट लोन दिल्यानंतर ग्राहकाचा छळ करून त्याला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचे समाेर येत आहे. मुलुंडपाठोपाठ चारकोपमध्ये मालिकांमध्ये कथा लेखन करणाऱ्या तरुणाने यातूनच गळफास घेऊन आयुष्य संपविले. याप्रकरणी चारकोप पोलिसांनी शनिवारी संबंधित कॉलधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

चारकोप परिसरात राहणारे जेनिस मकवाना यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा लहान भाऊ अभिषेक गेल्या १८ वर्षांपासून गुजराती, हिंदी मालिकांमध्ये कथा लेखन करत होता. २७ नोव्हेंबरला अभिषेकने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येमागचे गूढ कायम असताना, २९ नोव्हेंबरला सकाळी १०.३०च्या सुमारास अनोळखी मोबाइलवर कॉल सुरू झाले. यात, कॉलधारकाने अभिषेकबाबत चौकशी केली. अभिषेकचे निधन झाल्याचे सांगताच कॉलधारकाने अभिषेकच्या नावाने शिवीगाळ सुरू केली.

अभिषेकने ऑनलाइन लोन ॲपमधून लोन घेतले असून, ते परत केले नसल्याचे सांगितले. पुढे ऑनलाइन लोन देणाऱ्या ॲपमधून बोलत असल्याचे सांगून शिवीगाळ करत जिवेठार मारण्याची धमकी त्याच्या भावाला दिली. त्यानंतर नातेवाईक, मित्रांनाही कॉल सुरू झाले. त्यातच भावाला अभिषेकचा फाेन सापडला. त्याच्या फोनवरही अशा धमकीचे काॅल आल्याचे भावाच्या लक्षात आले. भावाने दि.२ जानेवारी रोजी त्याचा ई-मेल तपासला असता, त्यामध्ये मार्च २०२० पासूनचे लोनची मागणी केलेले ई-मेल व त्यानुसार त्याला पैसे मिळाल्याचा इमेल आल्याचे लक्षात आले. पुढे एका दिवसात ४० ते ४५ ऑनलाइन ॲपवरून पैसे अभिषेकच्या बँक खात्यात जमा केल्याचे दिसून आले. त्याने ते पुन्हा पाठविल्याचेही मेलवरून स्पष्ट झाले.

अभिषेकने डाउनलोड केलेल्या ॲपमधून त्याची सर्व माहिती चोरी करून त्याच्या कोटक महिंद्रा बँक खात्यामध्ये मागणी न करता पैसे जमा करण्यात आले हाेते. परंतु त्याला त्याची आवश्यकता नसल्याने त्याच्याकडून ते पैसे परतही घेण्यात आले हाेते. त्याने घेतलेल्या लोनची वसुली करण्यासाठी अनोळखी मोबाइल क्रमांकावरून वारंरवार फोन करून त्याला त्रास दिल्याचा तसेच पैशांच्या वसुलीसाठी शिवीगाळ करून त्याला मारण्याची, घरी गुंड पाठविण्याची, अभिषेकचे फोटो, कागदपत्रे प्रसारित करून बदनामी करण्याची धमकीही त्याला देण्यात आल्याची त्याच्या भावाची तक्रार आहे. याच त्रासाला कंटाळून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा संशयही त्यांनी वर्तविला असून, त्यानुसार पोलीस अधिक तपास करत आहेत.

.............................................

Web Title: Another person lost his life due to 'Loan Pay' app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.