Join us

अर्नब गोस्वामीविरुद्ध आणखी एक गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 02:24 IST

रजा एज्युकेशनल वेलफेअर सोसायटीचे सचिव इरफान शेख (४२) यांच्या तक्रारीवरून पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुंबई : एका वृत्त वाहिनीचे संपादक अर्नब गोस्वामी यांच्या विरुद्ध वांद्रे गर्दीप्रकरणानंतर धार्मिक भावना दुखावणारे आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात वृत्त वाहिनीचे चालक आणि मालकांचाही समावेश आहे.सध्या गोस्वामी यांच्याशी संबंधीत दोन गुन्ह्यांचा तपास ना. म. जोशी मार्ग पोलीस करत आहेत. २३ एप्रिलला त्यांच्यावर दोन तरुणांनी शाई हल्ला केला होता. हा हल्ला काँग्रेसने घडवून आणल्याचा दावा गोस्वामी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात केला होता. गोस्वामी यांनी आपल्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा पालघर प्रकरणाशी त्यांचा संबंध जोडताना आक्षेपार्ह, अपमानजनक भाषेचा वापर केल्याबाबत ना. म. जोशी पोलीस तपास करत आहेत.

त्यातच, शनिवारी पायधुनी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध आणखीन एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रजा एज्युकेशनल वेलफेअर सोसायटीचे सचिव इरफान शेख (४२) यांच्या तक्रारीवरून पोलीस अधिक तपास करत आहेत. त्यांनी केलेल्या आरोपानुसार, गोस्वामी यांनी १४ एप्रिल रोजी वांद्रे स्थानकाबाहेर जमलेल्या समुदायाबाबत वृत्त देताना धार्मिक भावना दुखावणारे आक्षेपार्ह विधान करत घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यानुसार पायधुनी पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत अधिक तपास केला आहे.

टॅग्स :अर्णब गोस्वामी