Join us  

ओम साई सिद्धी खिडकी वडापावमध्ये आढळली पाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 4:23 PM

अंबरनाथनंतर आता बदलापूरच्या ओम साई स्नॅक्सच्या वडापावमध्ये पाल सापडल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

बदलापूर : बदलापूर पश्चिमेला रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या ओम साई सिद्धी खिडकी वडा पावमध्ये मृत पाल आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. काहीच दिवसांपूर्वी अंबरनाथ येथे देखील बबन वडापाव सेंटरमध्ये पाल आढळली होती. त्यानंतर आता लगेचच बदलापूर येथे असलेल्या खिडकी वडा पावमध्ये पाल आढळल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ओम साई स्नॅक्स कॉर्नर हे वडापाव सेंटर खिडकी वडा पाव म्हणून बदलापूर पश्चिम भागात प्रसिद्ध आहे. या प्रकारानंतर दुकान बंद करण्यात आले आहे.

फुटपाथवरच हे सेंटर गेल्या अनेक दिवसांपासून चालवण्यात येत होते. बदलापूर पश्चिमेला असलेल्या या ओम साई स्नॅक्स कॉर्नर वडापाव सेंटरवर मंगळवारी सकाळी या सेंटर मधील वडापावमध्ये पाल आढळल्याचा मेसेज व्हायरल झाला. मात्र या फोटोबाबत अनेक शंका होत्या. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.  तेथे पंचनामा केल्यानंतर तेथील मालकाचा मुलगा शैलेश चौधरी याने या वडापाव मध्ये पाल आढळल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे याप्रकरणी नगरपालिकेने हे वडापाव सेंटर बंद करून पोलिसांकडे रीतसर तक्रार केल्याची माहिती मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी दिली. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. तसेच अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे देखील याबाबत तक्रार करण्यात आली आहे.  खाण्यास अपायकारक पदार्थ विकल्याप्रकरणी या सेंटरचे मालक मेराराम चौधरी याच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्याचे माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्र यांनी दिली. 

सलग एका आठवड्यात वडापावमध्ये दोन ठिकाणी पाली आढळल्याने नेमके या प्रकरणातील सत्य शोधुन काढण्याची गरज व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे या प्रकारानंतर दोन्ही ठिकाणी अन्न आणि औषध प्रशासनाकडे कोणतेच नमुने देण्यात आलेले नाही. त्यामुळे बडापाव सेंटर बंद करण्यासाठी असे प्रकार केले जात आहे की या प्रकारात सत्य आहे हे शोधण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. बदलापूरातील प्रकारात ज्यांना ही पाळ वडय़ात आढळली ते तक्रारदार देखील पुढे आलेले नाहीत. 

टॅग्स :बदलापूरएफडीए