मुंबई : मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या राज्यांच्या सहा विभागांतील अकरावी प्रवेशप्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत नियमित फेऱ्या, विशेषफेऱ्या आणि एफसीएफएस फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले. मात्र काही विद्यार्थी अद्यापही प्रवेशाविना असल्याने त्यांना प्रवेशाची अतिरिक्त संधी देण्यासाठी एफसीएफएस फेरीचे आयोजन करण्याच्या सूचना शिक्षण संचलनालयाने दिल्या आहेत. शिक्षण संचलनालयाच्या माहितीवरून राज्यात सहा विभागांतील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत १ लाख ८५ हजारांहून अधिक जागा रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. अतिरिक्त एफसीएफएस फेरीमध्ये एटीकेटीसह दहावी उत्तीर्ण असलेले सर्व विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरतील. ५ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या फेरीदरम्यान विद्यार्थी आपले आधीचे प्रवेश रद्द करू शकतील. त्यानंतर त्यांची छाननी करून ८ ते १२ फेब्रुवारीदरम्यान एफसीएफएस प्रक्रियेद्वारे त्यांना अलॉटमेंट मिळालेल्या जागांवर ‘प्रोसिड फॉर ॲडमिशन’ या बटणावर क्लिक करून प्रवेश निश्चित करू शकतील. या प्रवेशदरम्यान बायफोकल व कोटा प्रवेश सुरू राहतील. १३ फेब्रुवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना आपले प्रवेश अकरावी प्रक्रियेमध्ये निश्चित करण्याची संधी मिळेल. १४ फेब्रुवारी रोजी अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या २०२०-२१ मधील रिक्त जागांची स्थिती सादर केला जाईल, अशी महिती शिक्षण संचलनालयाचे संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली.
अकरावी प्रवेशासाठी आणखी एक अतिरिक्त फेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 08:17 IST