Join us  

नौदलातील हेरगिरीप्रकरणी आणखी एकाला मुंबईतून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 12:53 AM

हेरगिरीप्रकरणी गेल्या वर्षी १६ नोव्हेंबरला आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे गुन्हा दाखल झाला. भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुडी आणि संरक्षणविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळविण्यासाठी पाकिस्तानने काही एजंटची भरती केली होती.

मुंबई : भारतीय नौदलातील गुपिते आणि संरक्षणविषयक महत्त्वाच्या घडामोडींबाबत हेरगिरी केल्याप्रकरणी राष्ट्रीय विशेष तपास (एनआयए) पथकाने आणखी एका मुख्य सूत्रधाराला मुंबईतून शुक्रवारी अटक केली. मोहम्मद हारून उर्फ हाजी अब्दुल रहमान लकडावाला (वय ४९) असे त्याचे नाव आहे. आतापर्यंत या प्रकरणी नौदलातील ११ जवानांसह १४ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये पाकिस्तानात जन्मलेल्या भारतीय तरुणीचाही समावेश आहे.हेरगिरीप्रकरणी गेल्या वर्षी १६ नोव्हेंबरला आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे गुन्हा दाखल झाला. भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुडी आणि संरक्षणविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळविण्यासाठी पाकिस्तानने काही एजंटची भरती केली होती. नौदलातील जवानांशी ओळख करून घेऊन ते त्यांच्याकडून गोपनीय माहिती मिळवत. त्या बदल्यात त्यांच्या बँक खात्यावर मोठी रक्कम जमा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.मुंबईतील हारूनवर ही जबाबदारी होती. त्यासाठी त्याने अनेक वेळा पाकिस्तानात जाऊन हेर अकबर आणि रिझवान यांची भेट घेतली होती. त्यांच्या सांगण्यावरून तो जवानांच्या खात्यावर पैसे जमा करीत असे, अशी माहिती तपासातून पुढे आलीे. हारूनच्या घराच्या झडतीतून अनेक कागदपत्रे, डिजिटल उपकरणे जप्त केली असून त्याची शहानिशा करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :गुन्हेगारी