ठाणे जि.प.च्या ४५ गटांची आरक्षणे जाहीर
By Admin | Updated: August 12, 2015 23:23 IST2015-08-12T23:23:09+5:302015-08-12T23:23:09+5:30
ठाणे जिल्हा परिषदेच्या ४५ गटांंची आरक्षण सोडत बुधवारी काढण्यात आली. त्यानुसार २५ गट हे विविध प्रवर्गांतील महिलांसाठी राखीव झाले आहेत.

ठाणे जि.प.च्या ४५ गटांची आरक्षणे जाहीर
ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या ४५ गटांंची आरक्षण सोडत बुधवारी काढण्यात आली. त्यानुसार २५ गट हे विविध प्रवर्गांतील महिलांसाठी राखीव झाले आहेत.
ही सोडत बुधवारी काढण्यात आली. या वेळी ४५ गटांमधून अनुसूचित जातींच्या महिला प्रवर्गसाठी म्हारळ आणि वासिंद हे दोन तर कांबा ही जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित ठेवली आहे. तसेच अनुसूचित जमातींसाठीच्या महिला प्रवर्गांसाठी शिरोळे, टोकावडे, कांबे, खारबाव, बिरवाडी, माळ आणि मोखावणे या सात जागा राखीव झाल्या आहेत. साकडबाव, आवळी, डोळखांब, गणेशपुरी, परिवली आणि कुंदे अनुसूचित जमातींसाठी आरक्षित झाले आहेत. दरम्यान, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी १४ जागांच्या आरक्षणांमध्ये शेलार, किन्हवली, गोवेली, घोटसई, राहनाळ, मळेगाव आणि वांगणी या सात जागा स्त्रियांसाठी राखीव झाल्या आहेत. तर उर्वरित सात जागा या नागरिकांच्या मागास प्रवर्गातील इतरसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. तसेच सर्वसाधारण प्रवर्गासाठी १५ जागांच्या आरक्षणांपैकी खोणी, करवली, रांजनोली, अंजूर, गोठेघर, खोणी-भिवंडी, अंबाडी, कुरु ंद आणि शिवनगर या नऊ जागा या स्त्रियांसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून उर्वरित सहा जागा या सर्व प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या आहेत.
झेडपीच्या जानेवारी २०१५ मधील निवडणुकीवर सर्वपक्षीयांनी बहिष्कार टाकला होता. मात्र, झेडपीतील आठ गट आणि पंचायत समितीच्या १० गणांमध्ये ही सार्वत्रिक निवडणूक झाल्याने कोणालाही बहुमत न मिळाल्याने येथे पोटनिवडणूक होणे अपेक्षित होते. त्या वेळी निवडून आलेल्या त्या गट आणि गणांना धक्का न लावता उर्वरित ४५ गटांसाठी व पंचायत समित्यांच्या ११० गणांमध्ये वर्षभरातच दुसऱ्यांदा सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.
मुरबाड पंचायत समितीत मातब्बरांना दे धक्का
मुरबाड पंचायतीच्या उर्वरित गणांची निवडणुकीची सोडत बुधवारी सकाळी ११ वाजता वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील व भाई कोतवाल सभागृहात पार पडली. या वेळी महत्त्वाचे गण अनुसूचित जमातीसाठी व काही महिलांसाठी राखीव झाल्याने निवडणुकीसाठी दंड थोपटून तयारीत असलेल्या मातब्बरांना या आरक्षण सोडतीत धक्का बसला असून सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्यांना पाच वर्षे वनवास भोगावा लागणार आहे.
मागील निवडणुकीत निवड झालेले सात गण सोडून नऊ गणांची सोडत काढण्यात आली. यामध्ये अनुसूचित जमाती स्त्री जागेसाठी फांगुल गव्हाण गण, माळ अनु. जमाती पुरु ष, धसई डोंगरन्हावे सर्वसाधारण जागा, शिरवली पवाले इतर मागास स्त्री जागा, ब्राह्मणगाव सर्वसाधारण जागा, सरळगाव कोळोशी सर्वसाधारण स्त्री जागा, अशा पद्धतीने आरक्षण सोडत काढण्यात आली.
या वेळी मुरबाड तहसीलदार सर्जेराव म्हस्के पाटील, नायब तहसीलदार विजय तलेकर व अजय पाटील यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. मात्र, या सोडतीकडे राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी पाठ फिरवली.
शहापूर पंचायत समितीचीही निघाली सोडत
काही महिन्यांपूर्वी ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर बहिष्कार घातल्याने तसेच जि.प. गटांच्या फेररचनेमुळे आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जि.प. गट व पंचायत समिती गण यांचे आरक्षण आज सोडतीद्वारे जाहीर करण्यात आले.
ठाणे जिल्हा परिषदेच्या तालुक्यातील १४ जागांपैकी २ जागेवर यापूर्वीच निवडणुकीत उमेदवार विजयी झाले असल्याने उरलेल्या १२ जागांमध्ये शिरोळ स्त्री, मोखावणे स्त्री, डोळखांब,
साकडबाव, बिरवाडी स्त्री, अघई या जागा अनुसूचित जमातींसाठी (आदिवासी) यांच्यासाठी तर वासिंद (अनुसूचित जाती स्त्री) राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच चेरपोली, गोठेघर स्त्री, मळेगाव स्त्री, किन्हवली स्त्री या सर्वसाधारण वर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
तसेच शहापूर पंचायत समितीसाठी शिरोळ, डोळखांब, वेहळोली, अघई, आवाळे, आसनगाव, मांजरे या जागा अनुसूचित जमाती (स्त्री), खर्डी, मोखावणे, कसारा, गुंडे, साकडबाव, टेंभा, कळमगाव या अनुसूचित जमाती (पुरुष), वासिंद (पश्चिम), वासिंद (पूर्व स्त्री) या अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. बिरवाडी, गोठेघर स्त्री, मळेगाव स्त्री, चेरपोली, नडगाव, दहिवली, किन्हवली (सर्वसाधारण), धसई, आस्नोली, मानेखिंडे येथे (सर्वसाधारण स्त्री) साठी राखीव ठेवण्यात आले आहे.
पंचायत समिती आरक्षण सोडत
म्हारळ/बिर्लागेट : कल्याण-डोंबिवली शहरानजीक असलेली २७ गावे पुन्हा महापालिकेत समाविष्ट झाल्याने पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या गण आणि गटरचनेवर परिणाम झाला असून तालुक्यात १० नवीन गणांची निर्मिती झाली आहे.
कल्याण तालुक्यातील होऊ घातलेल्या पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कल्याण पंचायत समिती सभागृहात पंचायत समिती गणांचे आरक्षण काढण्यात आले. या वेळी प्रांताधिकारी डॉ. धनंजय सावळकर, तहसीलदार किरण सुरवसे, नायब तहसीलदार डॉ. उद्धव कदम आदी अधिकारी उपस्थित होते.
कल्याण पंचायत समितीचे १२ गण तयार करण्यात आले असून १ लाख २४ हजार लोकसंख्येपैकी १० हजार ३०२ लोकसंख्येचा एक गण तर २० हजार ७४४ लोकसंख्येचा जिल्हा परिषदेचा एक गट तयार करण्यात आला आहे. नुकतीच महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेली २७ गावे पंचायत समितीमध्ये असताना १२ हजार ५०० चा गण तर २५ हजार लोकसंख्येचा एक गट मिळून १३ गण व २६ गट निर्माण झाले होते.
मात्र, आता ही गावे महापालिकेत समाविष्ट झाल्याने १२ गण तयार झाले आहेत. यामध्ये खोणी, पिंपरी, खडवली, नडगाव-दानबाव, राये, घोटसई, मांजर्ली, रायते, कांबा, म्हारळ (अ), म्हारळ (ब), म्हारळ (क) यांचा समावेश करण्यात आला आहे.
अंबरनाथ तालुक्यातील आठ गणांची आरक्षण सोडत तहसीलदार कार्यालयात काढण्यात आली. मांगरूळ (सर्वसाधारण महिला), नाऱ्हेण (सर्वसाधारण), मुळगाव (सर्वसाधारण), चरगाव (अनुसूचित जमाती), खरड (नागरिकांचा मागास प्रवर्ग), चामटोली (अनुसूचित जमाती महिला), गांगणी १ (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला) आणि वांगणी २ (अनुसूचित जाती महिला) असे आरक्षण पडले आहे.
कल्याणची सोडत
म्हारळ/बिर्लागेट : कल्याण-डोंबिवली अनुसूचित जातीच्या लोकसंख्येनुसार म्हारळ ब हा गण राखीव ठेवण्यात आला आहे. रायते हा गण अनुसूचित जमातीकरिता राखीव ठेवण्यात आला आहे. उर्वरित १० गणांपैकी नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता ३ जागा निश्चित करत सोडत काढत कांबा, पिंपरी व खोणी हे ३ गण राखीव ठेवण्यात आले आहेत. राये, मांजर्ली, म्हारळ (क), घोटसई, म्हारळ (अ) हे सर्व गण साधारण बनले आहेत. या गणांमधीलही ३ जागा महिलांसाठी राखीव ठेवून त्यांची सोडत काढली. त्यामध्ये मांजर्ली, घोटसई व म्हारळ अ हे ३ गण महिलांसाठी आरक्षित करण्यात आले. यानंतर अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवलेल्या गणांतून सोडत काढून तो महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आला, तर रायते अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित झाला. पूर्वीच्या बेहरे गणात खडवली, नडगाव हे दोन गण तयार झाले. म्हारळमध्ये म्हारळ ब, म्हारळ क दहागावमध्ये, कांबा, रायते, मांजर्ली, असे ३ गण व निळजेमध्ये खोणी व नारिवलीमध्ये पिंपरी असे एकूण १० गण नव्याने तयार झाले आहेत. दरम्यान, यंदा पंचायत समितीमध्ये १० नव्या गणांची निर्मिती झाल्याने राजकीय समीकरणे बदलली असून नव्यांना संधी मिळणार आहे. शहरानजीक असलेली २७ गावे महापालिकेत समाविष्ट झाल्याने पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या गण आणि गटरचनेवर परिणाम झाला असून १० नवीन गणांची निर्मिती झाली आहे.