लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकीच्या हत्येचा कट रचणारा गँगस्टर अनमोल बिश्नोई हा मारेकऱ्यांच्या सतत संपर्कात होता. तो त्यांना एक फ्लॅट, चारचाकी आणि पाच लाख रुपये आगाऊ देण्याचे आश्वासन देऊन मारेकऱ्यांना गुन्हा करण्यास प्रवृत्त करत होता, असा दावा पोलिसांनी विशेष मकोका न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात केला आहे.
सध्या अमेरिकेत कारागृहात असलेल्या अनमोल बिश्नोईने या संघटित गुन्ह्याचे नेतृत्व केले. त्याच्या सदस्यांनी बाबा सिद्दीकींची हत्या केली, असे पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे. अनमोलने स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्राम अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे आरोपींशी संपर्कात होता. त्यापैकी फरारी आरोपी लोणकरने केलेल्या पोस्टवर सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली, असे आरोपपत्रात नमूद आहे. आरोपींचा कबुलीजबाब व डिजिटल पुराव्यांद्वारे पोलिसांनी या हत्येत अनमोल बिश्नोईची असलेली भूमिका मांडली.
संभाषणही सादर‘राम राम भाई लोग, आप सबको लॉरेन्स भाई ने भी राम राम बोलने को बोला है. क्या चल रहा है? अपने को एक काम करना है, हिम्मत रखो. बांद्रा में घर के पास रेकी करना है, उस एरिया मे एक घर भाडे से लो. अपना काम होने के बाद एक फोरव्हीलर गाडी और एक फ्लॅट हर एक को मिलेगा…उससे पहले ५ लाख अँडव्हान्स दुंगा. अपने भाई का बदला लेना है.अपने को अपने धरम के लिए जीने का है…’ अन्य तीन सहआरोपींच्या उपस्थितीत लोणकर आणि अनमोल यांच्यातील फोनवरील हे संभाषण असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
२६ आरोपींविरुद्ध गुन्हा एसआरए पुनर्विकाससंदर्भात काही व्यक्तींसोबत झालेल्या बैठकीत एका बिल्डरने माझ्या वडिलांबद्दल अपशब्द वापरले होते, असे झिशान यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी अटक केलेल्या २६ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर, शुभम लोणकर, यासीन अख्तर, अनमोल बिश्नोई या तिघांना फरारी आरोपी म्हणून दाखवले आहे.