हत्तींवर नियंत्रणासाठी होतोय ‘अंकुश’चा वापर
By Admin | Updated: October 5, 2015 03:05 IST2015-10-05T03:05:12+5:302015-10-05T03:05:12+5:30
केरळ सरकारने हत्तींना नियंत्रणात आणण्यासाठी लोखंडाचे धारदार शस्त्र अंकुशच्या वापरावर निर्बंध घातले असतानाही अनेक माहुतांकडून अजूनही याचा सर्रास वापर होत

हत्तींवर नियंत्रणासाठी होतोय ‘अंकुश’चा वापर
तिरुअनंतपुरम : केरळ सरकारने हत्तींना नियंत्रणात आणण्यासाठी लोखंडाचे धारदार शस्त्र अंकुशच्या वापरावर निर्बंध घातले असतानाही अनेक माहुतांकडून अजूनही याचा सर्रास वापर होत असल्याचा आरोप वन्यप्राण्यांच्या अधिकारासाठी काम करणाऱ्या हेरिटेज अॅनिमल टास्क फोर्सने केला आहे.
हत्तींना काबूत ठेवण्यासाठी बहुतांश माहुतांकडून अंकुशचा वापर होत असून हत्तींच्या संवेदनशील अवयवांवर ते याद्वारे इजा पोहोचवित आहेत, असे त्रिशूर येथील या संघटनेचे म्हणणे आहे. स्थानिक भाषेत अंकुशला ‘थोट्टी’ म्हणतात.
हेरिटेज अॅनिमल टास्क फोर्सचे सचिव व्ही.के. व्यंकटचलम यांनी एका पत्रकाद्वारे या गंभीर मुद्याकडे लक्ष वेधताना सांगितले की, राज्याच्या वन विभागाने यावर्षी मे महिन्यात लोखंडाद्वारे निर्मित अंकुशच्या वापरावर बंदी घातली आहे. परंतु माहुतांकडून दररोज या आदेशाचे उल्लंघन होत आहे.
अलिकडेच राजस्थान उच्च न्यायालयाने अंकुशवर बंदी घालण्यासंदर्भात निर्णय दिला होता. त्या आधारेच वन महानिरीक्षक (हत्ती प्रकल्प) यांनी राज्याच्या वन विभागास या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी पावले उचलण्यास सांगितले होते. त्यानंतर मुख्य वन्यजीवसंरक्षकांनी मे महिन्यात एक पत्रक काढून अंकुशच्या वापरावर निर्बंध घालण्यासोबतच या आदेशाच्या कठोर अंमलबजावणीच्या सूचना दिल्या होत्या.
अंकुश आणि कॅप्चर बेल्टसारख्या प्रतिबंधित शस्त्रांनी सज्ज हत्तींची अनधिकृत पथके उत्सवांमधील मिरवणुकीत हत्तींना अतोनात यातना देतात, असा आरोप व्यंकटचलम यांनी केला.
हत्तींवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने त्वरित कठोर पावले उचलून वन्यजीवांविरुद्ध गुन्ह्णात सामील लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी या संघटनेने केली आहे. (वृत्तसंस्था)