Join us  

“अँटिलिया प्रकरण, मनसुख हिरेन हत्या कटाचे परमबीर सिंगच मास्टरमाईंड”: अनिल देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2022 5:54 PM

अँटिलियासमोर स्फोटके ठेवल्याप्रकरणी आपल्याला माहिती देताना परमबीर सिंग दिशाभूल करत होते, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. यामधून अनेक धक्कादायक आणि खळबळजनक खुलासे समोर येत आहेत. तसेच सचिन वाझे (Sachin Vaze) आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांच्यावर अनिल देशमुख मोठे आरोपही करत आहेत. यातच आता अँटिलिया प्रकरण, मनसुख हिरेन हत्या कटाचे परमबीर सिंग हेच मास्टरमाईंड असल्याचा मोठा दावा अनिल देशमुख यांनी ईडीसमोर केला आहे. 

अँटिलियासमोर स्फोटके ठेवल्याप्रकरणी आपल्याला माहिती देताना परमबीर सिंग दिशाभूल करत होते. कारण या प्रकरणात त्यांचे सहकारी सचिन वाझे यांचे नाव समोर आले होते आणि सिंग हेच त्याचे मास्टरमाईंड आहेत, असे आपल्याला कळले होते. म्हणून त्यांना आयुक्तपदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर त्यांनी आपल्यावर खोटे आरोप केले आणि नैतिकता म्हणून आपण गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. 

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तपास एटीएसकडे सोपवला

परमबीर सिंग यांना पोलीस आयुक्तपदावरून हटवल्यानंतर त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. अँटिलिया घोटाळा आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात त्यांच्यासह त्यांचे जवळचे मित्र सचिन वाझे आणि अन्य चार जणांची नावे समोर आल्याने सिंग यांना आयुक्तपदावरून हटवण्यात आले होते. सचिन वाझे आणि त्यांचे सहकारी मनसुख हिरेन यांनी स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनच्या काठ्या लावल्याचा आरोप होता, या प्रकरणी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली होती. ब्रीफिंगसाठी बोलावले होते, तेव्हा मी गृहमंत्री होतो आणि सिंग यांना बोलावले तेव्हा मी, अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, लिमये आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होतो. त्या ब्रीफिंगवेळी अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हत्येच्या संदर्भात सिंग देत असलेली ब्रीफिंग दिशाभूल करणारी होती. यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्याचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला, असेही देशमुख यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, मला कुठल्याही व्यक्तीने यादी दिलेली नव्हती, तर अनिल परब यांनी यादी दिली होती. तिच यादी अतिरिक्त मुख्य सचिवांना दिली होती. बदल्यांसंदर्भातील यादी गृह मुख्य सचिवांकडे द्यावी लागते. त्यानुसार ती दिली होती. या यादीनुसारच बदली करावी. पण जे नियमात बसत असेल तेच करा नाहीतर नावे बाहेर काढा असेही तत्कालीन सचिवांना सांगितले होते, असे अनिल देशमुख यांनी यापूर्वी म्हटले होते.  

टॅग्स :अनिल देशमुखमनसुख हिरणसचिन वाझेपरम बीर सिंग