नाराज मच्छीमार नेते, कार्यकर्ते प्रचारात
By Admin | Updated: October 12, 2014 23:11 IST2014-10-12T23:11:34+5:302014-10-12T23:11:34+5:30
प्रस्तावित अर्नाळा बंदराचे पडसाद समुद्रकिनारी असलेल्या मच्छीमार गावातील मतदानावर उमटण्याची दाट शक्यता आहे. बंदराला ज्या राजकीय पक्षांनी पाठींबा दिला

नाराज मच्छीमार नेते, कार्यकर्ते प्रचारात
दिपक मोहिते, वसई
प्रस्तावित अर्नाळा बंदराचे पडसाद समुद्रकिनारी असलेल्या मच्छीमार गावातील मतदानावर उमटण्याची दाट शक्यता आहे. बंदराला ज्या राजकीय पक्षांनी पाठींबा दिला त्यांच्या विरोधात तमाम मच्छीमार समाज मतदान करण्याची दाट शक्यता आहे. या सर्व मच्छीमार गावांमध्ये मच्छीमार समाजाचे ८० ते ८५ टक्के मतदान होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. समाजाचे नेते राजु तांडेल सध्या प्रचारामध्ये मच्छीमार गावे पिंजुन काढीत आहेत.
वसई, नालासोपारा या मतदारसंघाला विशाल समुद्रकिनारपट्टी लाभली आहे. सुमारे १० ते १५ गावामध्ये ३० ते ४० हजार मच्छीमार मतदार आहेत. दिड वर्षापुर्वी अर्नाळा येथे अद्ययावत बंदर बांधण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतला होता. त्या निर्णयास अर्नाळावासीय मच्छीमारांचा कडाडून विरोध झाला. आम्हाला उध्वस्त करणारे हे बंदर नको अशी भूमीका घेत मच्छीमार रस्त्यावर उतरले होते. मच्छीमार स्वराज्य समितीचे अध्यक्ष राजू तांडेल यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. त्यावेळी काही नेत्यांनी बंदर व्हावे म्हणून प्रयत्न केले होते. त्यामुळे मच्छीमार समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली होती. मच्छीमार स्वराज्य समितीचे कार्यकर्ते राजू तांडेल यांच्या नेतृत्वाखाली प्रचारात उतरले असून जोरदार प्रचार ते करीत आहेत. वसई, नालासोपारा, पालघर व डहाणू या चारही मतदारसंघामध्ये मच्छीमार समाज बंदराला पाठींबा देणाऱ्यांच्या विरोधात मतदान करतील असा अंदाज आहे.