मुंबई : गेले कित्येक दिवस खार दांडा कोळीवाडा गावात पाणी टंचाई असल्याने खार दांडा कोळीवाडा नाक्यावर संतप्त नागरिकांनी आज सायंकाळी सुमारे ७ च्या सुमारास रस्ता रोको आंदोलन केले असून अजूनही येथे आंदोलन सुरू आहे. येथील खार दांड्याचा मुख्य रस्ता येथील नागरिकांनी बंद केल्याने या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. विशेष म्हणजे येथील भीषण पाणी टंचाई ही स्थानिक भाजप आमदार आशिष शेलार यांच्या मतदारसंघात असून त्यांनी याप्रकरणी जातीने लक्ष घालावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
याबाबत खार दांडा कोळीवाडा गावठाण संघाचे सचिव मनोज कोळी यांनी सांगितले की, गेले ४-५ दिवस खार दांडा कोळीवाडा गावात पिण्याचा एक थेंब ही पाणी येत नाही. त्यामुळे स्थानिक नागरिक मुख्यत्वे करून कोळी महिला व जेष्ठ नागरिकांना प्रचंड मानसिक, शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते. पालिकेच्या एच पश्चिम विभागाचे वरिष्ट अधिकारी वर्ग निष्काळजीपणा करत असून आमचा कॉल सुद्धा उचलत नसून प्रश्नाला फिरवा फिरवीची उत्तरे देतात अशी माहिती त्यांनी दिली.
येथील पाण्याची ही समस्या ही आताची नसून गेली ३-४ वर्ष येथे नेहमीच पाण्याची समस्या भेडसावत आहे.येथील वॉर्ड ऑफिसर विसपुते पाणी टंचाई वर कोणताच तोडगा काढत नाही.त्यामुळे येथील नागरिकांच्या सहनशीलतेचा आता अंत झाल्याने संतप्त स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरून खार दांडा कोळीवाडा मुख्य नाक्यावर रस्ता रोको आंदोलन केले अशी माहिती मनोज कोळी यांनी दिली.