नातेवाइकांच्या मागणीमुळे नाराजी

By Admin | Updated: May 19, 2015 02:06 IST2015-05-19T02:06:33+5:302015-05-19T02:06:33+5:30

अरुणा शानबाग यांचे निधन झाल्यावर केईएम रुग्णालयाने अरुणांच्या नातेवाइकांना यायचे आवाहन केले होते. या आवाहनानंतर दुपारी १२ च्या सुमारास अरुणाचे भाचे आणि भाची केईएम रुग्णालयात दाखल झाले.

Angered by relatives demand | नातेवाइकांच्या मागणीमुळे नाराजी

नातेवाइकांच्या मागणीमुळे नाराजी

डॉ़ सुपे यांचा तोडगा : केईएम आणि नातेवाइकांनी केले एकत्रित अंत्यसंस्कार
मुंबई : अरुणा शानबाग यांचे निधन झाल्यावर केईएम रुग्णालयाने अरुणांच्या नातेवाइकांना यायचे आवाहन केले होते. या आवाहनानंतर दुपारी १२ च्या सुमारास अरुणाचे भाचे आणि भाची केईएम रुग्णालयात दाखल झाले. पण आल्यानंतर लागलीच त्यांनी आम्हाला अरुणाचे अंत्यसंस्कार करायचे आहेत, असे सांगायला सुरुवात केली. यामुळे परिचारिकांची मनं दुखावली गेली.
गेल्या ४२ वर्षांपासून परिचारिका, डॉक्टर, रुग्णालयातील कर्मचारी अरुणाची सेवा करत होते. अरुणाला काय हवे, तिला काय आवडते हे आम्हीच पाहात होतो. सर्वोच्च न्यायालयाने रुग्णालयाला पालकत्व दिले होते. असे असताना तिच्या मृत्यूनंतर तिचे नातेवाईक आले आणि हक्क सांगतात, यामुळे परिचारिका नाराज झाल्या होत्या. अंत्यसंस्कार तिच्या नातेवाइकांना करायला देणे याला परिचारिकांचा विरोध होता. अरुणाच्या नातेवाइकांनी अंत्यसंस्कार करण्याची इच्छा व्यक्त केल्यावर सर्वांनाच दु:ख झाले. यावर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी तोडगा काढला. कोणाचेही मन न दुखावता त्यांनी सर्वांकडून परवानगी घेऊन शेवटी एकत्र अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. सुपे यांनी नातेवाइकांशी चर्चा केली. यानंतर भोईवाडा पोलीस ठाण्यात नातेवाइकांचे जबाब नोंदवून घेण्यात आले.

बंदिस्त आयुष्य...
गेली कित्येक वर्षे त्या एकाच खोलीत होत्या. वॉर्ड क्रमांक ४ त्यांच्यासाठीच तयार करण्यात आला होता. त्यामध्ये त्या एकट्याच असायच्या. अरुणा यांना स्वत:हून हालचाल करता येत नव्हती. थोड्या थोड्या वेळाने त्यांची कूस बदलली जायची. पण त्या एकट्या असताना खाटेवरून पडू नयेत म्हणून चारही बाजूने स्टॅण्ड लावण्यात आले होते. इतका वेळ खाटेवर असूनही त्यांना कोणत्याही जखमा झाल्या नव्हत्या. पण त्यांचे विश्व त्या खोलीपुरतेच मर्यादित होते.

मृत्यू प्रमाणपत्रावरही अरुणा एकटीच...
१तब्बल चार दशके मृत्यूशी झुंज देणाऱ्या अरुणा शानबाग मृत्यू प्रमाणपत्रावरही एकट्याच आहेत. कारण स्मशानभूमीत महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या प्राथमिक मृत्यू प्रमाणपत्रावर डॉ. अविनाश सुपे वगळता उर्वरित कोणाचीच नोंद नाही. डॉ. सुपे यांच्याच हातात हे प्रमाणपत्र देण्यात आले. त्यामुळे त्याची मूळ प्रतही डॉ. सुपे यांनाच मिळेल. मात्र अरुणा यांचा अस्थीकलश त्यांच्या नातलगांना द्याव्यात, असे डॉ. सुपे यांनी अंत्यविधी करणाऱ्या पुरोहितांना सांगितले.

२सर्वसामन्यपणे अत्यंविधी आधी स्मशानभूमीत मयताचे नातलग डॉक्टरांनी दिलेल्या मृत्यू प्रमाणपत्राच्या आधारे अंत्यसंस्कारासाठी नोंद करून घेतात. त्यासाठी मयताचे पूर्ण नाव व त्याचा पत्ता घेतला जातो. तसेच मयताच्या नातलगाचाही तपशील घेतला जातो. मृत्युपत्राची मूळ प्रतही याच नातलगाला दिली जाते. मात्र अरुणा शानबाग यांच्या अंत्यसंस्कारासाठी नोंद करताना डॉ. सुपे यांचीच नातलग म्हणून नोंद करण्यात आली. त्यानंतर पुढील अंत्यविधी उरकला.

३या वेळेत भोईवाडा स्मशानभूमीतील कर्मचारी अरुणा शानबाग यांच्या नातलगांची वाट बघत होते. पण तेथे कोणीच आले नाही. नंतर अरुणा यांच्या आईचे नाव तेथील अधिकाऱ्यांना कळाले. त्यानुसार प्राथमिक मृत्यू प्रमाणपत्र तयार करून डॉ. सुपे यांच्याकडे देण्यात आले. आता पुढील १० दिवसांत अरुणा शानबाग यांचे मृत्यू प्रमाणपत्र पालिका जारी करेल. ही प्रत आॅनलाइनही उपलब्ध होते. प्राथमिक मृत्यू प्रमाणपत्रावर डॉ. सुपे यांचीच नोंद असल्याने पुढेही याची मूळ प्रत त्यांनाच मिळेल.

वॉर्ड क्रमांक ४
तसाच ठेवणार...
अरुणा आता आपल्यात नाही, यावर विश्वास बसत नाही. आजही सकाळी काही परिचारिका वॉर्ड क्रमांक ४ मध्ये जाऊन आल्या. पण आज वॉर्ड क्रमांक ४ सुन्न झाला होता. नेहमी या खोलीची साफसफाई केली जाते, आज काहीच केले नाही. या वॉर्डमध्ये अरुणाच्या असंख्य आठवणी आहेत. यामुळे आता हा वॉर्ड असाच ठेवण्यात येणार आहे.

परिचारिकांनी दिला खांदा
परिचारिकांनी गेली कित्येक वर्षे अरुणा शानबाग यांची काळजी घेतली होती. अरुणा यांचे निधन झाल्यावर केईएमचे वातावरण शोकाकुल झाले होते. अरुणा यांचे पार्थिव केईएम रुग्णालयातून बाहेर नेताना परिचारिकांनी खांदा दिला.

अरुणा आम्हाला सोडून गेली याचे आम्हाला दु:ख आहे. ती आमची होती. तिची काळजी घेणे हे आमचे काम कधीच नव्हते. प्रत्येक परिचारिका, विद्यार्थिनी आपणहून तिची सेवा करायला उत्सुक असायची. तिच्यावर अत्याचार झाल्याने तिचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले. पण यापुढे अशा घटना घडू नयेत म्हणून सगळेच सतर्क झाले. परिचारिकांना आम्ही तितके सक्षम केले आहे. प्रत्येकाची वर्कप्लेस सेफ असलीच पाहिजे.
- अरुंधती वेल्हाळ, मेट्रन

अरुणा तरुण असताना तिच्यावर झालेला अत्याचार हा खूपच वाईट प्रकार होता. तिला मी अनेकदा भेटले होते. ती आवाज ऐकायची. तिला हाक मारल्यावर ती काही प्रकारे आवाज काढायची. तिला मासे आवडायचे. मासे खायला दिल्यावर ती खूश दिसायची.
- स्वाती वराडकर, निवृत्त परिचारिका

 

Web Title: Angered by relatives demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.