चिमुरड्याकरिता तो ठरला देवदूत...
By Admin | Updated: December 21, 2015 01:27 IST2015-12-21T01:27:52+5:302015-12-21T01:27:52+5:30
वेळ दुपारची... अवघ्या पाच वर्षांचा तो मुलगा आईचा हात सुटल्याने भांबावलेल्या नजरेने तिला शोधत होता. इतक्यात, त्याला समोरच्या फलाटावर आई दिसली

चिमुरड्याकरिता तो ठरला देवदूत...
अंबरनाथ : वेळ दुपारची... अवघ्या पाच वर्षांचा तो मुलगा आईचा हात सुटल्याने भांबावलेल्या नजरेने तिला शोधत होता. इतक्यात, त्याला समोरच्या फलाटावर आई दिसली. कुठलाही विचार न करता त्या चिमुरड्याने रेल्वे रुळांवर उडी मारली. त्याच वेळी कर्जतहून येणारी लोकल वेगात फलाटात शिरत होती. एकच गलका झाला... हे दृश्य पाहणाऱ्या एका तरुणाने मागचा पुढचा विचार न करता रेल्वे ट्रॅकमध्ये उडी मारली आणि त्या चिमुरड्याला अलगद उचलून मृत्यूच्या सापळ्यातून त्याची सुटका केली. मात्र, त्या चिमुरड्याला वाचवणारा तो देवदूत कोण, ते अज्ञात राहिले... सीसीटीव्हीमध्ये हा थरार चित्रित केला गेला.
एक पाच वर्षांचा मुलगा आपल्या आईसोबत अंबरनाथला नातलगांकडे आला होता. त्याची आणि आईची चुकामुक झाली. भिरभिरणाऱ्या नजरेने तो आईला फलाट क्र.-२ वर शोधत होता. त्या वेळी त्याची आई फलाट क्रमांक-३ वर होती. तेवढ्यात, आई-मुलाची नजरानजर झाली आणि आईने मुलाला जीवाच्या आकांताने हाक मारली. मुलानेही आईला पाहताच रेल्वे ट्रॅकमध्ये उडी मारली. परंतु, तत्काळ आईला मुलाला वर घेणे शक्य झाले नाही. त्यातच, फलाटाची उंची जास्त असल्याने मुलाला वर चढता येईना. तेवढ्यात, त्या मुलाचा चिमुकला पाय रेल्वे रुळात अडकला. तो भेदरला, रडू लागला... त्याची आईही कासावीस झाली. इतक्यात, आजूबाजूच्या प्रवाशांनी लोकल आल्याचा गलका केला. कर्जतहून मुंबईकडे जाणारी लोकल काळ बनून त्या मुलाच्या दिशेने येत होती.